Washim Crime : अंधाराचा फायदा घेऊन दरोड्याचा कट; स्थानिक गुन्हे शाखेची थरारक कारवाई, तिघे गजाआड

Washim Crime
Published on
Updated on

वाशीम : वाशीम शहरात एका मोठ्या दरोड्याचा कट स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे वेळीच उधळला गेला आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील निर्जन व अंधाऱ्या जागेत दबा धरून बसलेल्या तीन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी मध्यरात्री थरारक पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले. संशयितांकडून दोन धारदार चाकू, मिरची पूड, कुलूप तोडण्याचे साहित्य आणि मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

वाशीम शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे स्टेशन परिसरात काही संशयित इसम दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांना मिळाली होती. माहितीचे गांभीर्य ओळखून पोलीस पथकाने तात्काळ हालचाली सुरू केल्या. रात्रीच्या अंधारात कोणताही संशय येऊ न देता पथकाने रेल्वे स्टेशन परिसरातील पडीक जागेभोवती गुप्तपणे वेढा घातला.

१० सप्टेंबरच्या रात्री सुमारे ११:३० वाजण्याच्या सुमारास पडीक जागेत संशयित हालचाली दिसून आल्यानंतर पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकला. अंधाराचा गैरफायदा घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीनही संशयितांना पोलिसांनी जागेवरच पकडले. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये विशाल कालबाल्या चव्हाण (वय ३५ वर्षे, रा. लहुजी नगर, वाशीम), यशवंत गंगाराम चव्हाण (वय ३४ वर्षे, रा. चांडस, ता. मालेगाव, जि. वाशीम) आणि शंकेश मनोहर भोसले (वय २० वर्षे, रा. चांडस, ता. मालेगाव, जि. वाशीम) यांचा समावेश आहे.

संशयितांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी वापरण्यात येणारे घातक साहित्य हस्तगत करण्यात आले. यामध्ये दोन धारदार चाकू, प्रतिकार रोखण्यासाठी आणलेली मिरची पूड, कुलूप किंवा दरवाजे तोडण्यासाठी लागणारा एक लांब खिळा, एक छोटी लोखंडी टामी, पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने वापरले जाणारे दोन हँडग्लोज आणि अंदाजे पाच हजार रुपये किमतीचा एक जुना वापरता मोबाईल फोन असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. हे तिघे शहरातील मोठी व्यापारी प्रतिष्ठाने अथवा लगतच्या रहिवासी भागात दरोडा घालण्याच्या तयारीत होते, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. स्थानिक गुन्हे शाखेने दाखवलेल्या तत्परतेमुळे संभाव्य गंभीर गुन्हा टळला असून पुढील सखोल तपास वाशीम शहर पोलीस करत आहेत.

सदर धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कामगिरीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आढे, पोलीस उपनिरीक्षक निलेश जाधव, पोलीस हवालदार गजानन झगरे, आशिष बिडवे, ज्ञानदेव मात्रे, दिलीप देवकते, पोलीस अंमलदार राजकुमार यादव, भूषण ठाकरे, अमोल ईरतकर, संतोष वाघ, तुषार ठाकरे, संदीप दुतोंडे, गोपाल चौधरी तसेच पोलीस चालक सुनील तायडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या यशस्वी कारवाईबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news