

Washim Maha Vikas Aghadi Agitation
वाशीम : पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढ तातडीने मागे घ्यावी, तसेच इंधन व खतांचा पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसंदर्भात वाशीम जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले.
महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील अकरा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर आठ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. आधीच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता आर्थिक अडचणीत सापडली असताना इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढत असल्याने नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या बारा वर्षांत पेट्रोलच्या किमतीत ३८ टक्के, तर डिझेलच्या किमतीत ६२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यूपीए सरकारच्या काळात कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले असतानाही पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात ठेवण्यात आले होते. मात्र, सध्या कच्च्या तेलाचे दर तुलनेने कमी असतानाही इंधनाचे दर शंभर रुपयांच्या आसपास कायम असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने पेट्रोलियम उत्पादनांवरील कर आणि उत्पादन शुल्काच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूल गोळा केला असून, अलीकडील दरवाढीतून तेल कंपन्यांनी काही तासांतच हजारो कोटी रुपयांची कमाई केल्याचा दावाही करण्यात आला.
इंधन दरवाढीचा फटका शेती क्षेत्रालाही बसत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सध्या पेरणीपूर्व कामांचा हंगाम सुरू होत असून, ट्रॅक्टरसाठी डिझेलची आवश्यकता असते. अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर पुरवठा विस्कळीत झाल्याने शेतीची कामे रखडत असल्याचा आरोप करण्यात आला. वेळेत शेतीची कामे पूर्ण न झाल्यास अन्नधान्य उत्पादनावर परिणाम होऊन महागाई आणखी वाढू शकते, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली.
याशिवाय, शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली असून, नीट परीक्षेतील गोंधळाबाबत कठोर कारवाई करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी पाणीपट्टी दरात करण्यात आलेली वाढ कमी करावी, अशी मागणी करण्यात आली. २०२०-२१ मध्ये प्रतिहेक्टर १२० रुपये असलेली पाणीपट्टी आता १२०० रुपये करण्यात आल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला.
या निवेदनावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजूभाऊ चौधरी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख बालाजी वानखेडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष बाबाराव पाटील खडसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाप्रमुख राजूभाऊ किडसे पाटील, तसेच आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष राम डोरले पाटील उपस्थित होते.