

Washim Garbage management issues
वाशिम : नगर परिषदेच्या निष्क्रिय व ढिसाळ कारभारामुळे शहरातील शेकडो मोकाट जनावरांचे जीव धोक्यात आले आहेत. शहरातील घरांमधून व दुकानांमधून दररोज जमा होणारा ओला व सुका कचरा डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. मात्र या कचरा डेपोचे गेट कायम उघडे असल्याने मोकाट जनावरे आत शिरून कचरा, प्लास्टिक पिशव्या आणि इतर घातक पदार्थ खात आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून त्यांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे.
नगर परिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येतात. या कचऱ्यात प्लास्टिक, सडलेले अन्न आणि घातक वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. याच कचऱ्यावर भटक्या जनावरांचा उदरनिर्वाह चालत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
अनेक ठिकाणी प्लास्टिक खाल्ल्यामुळे जनावरे आजारी पडत असल्याच्या घटना समोर येत आहेत, तर काहींचा मृत्यूही झाल्याची माहिती आहे. तरीही नगर परिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही स्वच्छता व्यवस्थेत कोणतीही ठोस सुधारणा झालेली नाही. परिणामी शहरात दुर्गंधी वाढत असून नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे.
नगर परिषद नेमकी कोणासाठी काम करते? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. जनावरांचे जीव वाचवण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असताना प्रशासन मात्र निष्क्रिय असल्याची भावना व्यक्त होत आहे.
शहरातील कचरा व्यवस्थापन तातडीने सुधारावे, प्लास्टिक कचऱ्यावर नियंत्रण आणावे, भटक्या जनावरांसाठी सुरक्षित अन्न व पाण्याची व्यवस्था करावी, दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, जर लवकरात लवकर ठोस पावले उचलली नाहीत, तर ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असून शेकडो जनावरांचे जीव धोक्यात येऊ शकतात.
संतोष व्यास, समाज सेवक