

MSEDCL Contractual Workers Strike
वाशीम : वाशीम जिल्ह्यात महावितरणमध्ये कंत्राटी ऑपरेटर तसेच विद्युत सहाय्यक म्हणून मागील १० ते १५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या १० हून अधिक कर्मचाऱ्यांना अचानक सेवेतून कमी करण्यात आल्याने त्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. सेवेत नियमित करण्याऐवजी कामावरून कमी केल्याने संबंधित कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढावल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
महावितरणच्या वाशीम येथील अधीक्षक कार्यालयाने संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून कमी केल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. अनेक वर्षे सेवा बजावूनही नियमितीकरणाऐवजी सेवेतून कमी करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
कामावर पुन्हा रुजू करून घेण्याची मागणी या कर्मचाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार केली. मात्र, त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी १५ ऑगस्टपासून वाशीम येथील महावितरणच्या अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे.
अनेक वर्षे महावितरणमध्ये काम केल्यानंतर अचानक रोजगार गमावल्याने कर्मचाऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महावितरण प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना सेवेत पुन्हा रुजू करून घ्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
दरम्यान, मागण्या मान्य करून कामावर रुजू करून घेतले नाही, तर यापुढे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.