

मालेगाव (जि. वाशिम) : येथे २१ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकीवर अचानक दगडफेक झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे विसर्जन मिरवणूक तात्पुरती थांबवण्यात आली. रात्री उशिरापर्यंत पोलीस प्रशासनाकडून परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू होते.
येथील क्रमांक ४ चे नवदुर्गा जनता नवदुर्गा उत्सव मंडळाची मिरवणूक सुरू असताना अज्ञातांकडून अचानक दगडफेक करण्यात आली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सतर्कता बाळगत मूर्तीला कोणतीही इजा पोहोचू दिली नाही. मात्र, या दगडफेकीत विठ्ठल आनंदा काळे हा तरुण जखमी झाला. इतरही काही नागरिक किरकोळ जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जखमींना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
या प्रकारानंतर मंडळाचे पदाधिकारी आणि उपस्थित तरुणांनी संबंधित समाजकंटकांचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी भूमिका घेत विसर्जन मिरवणूक जागीच थांबवून ठेवली. रात्रीचे अकरा वाजून गेल्यानंतरही तणावपूर्ण शांतता कायम होती. पोलीस दलाने घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन बंदोबस्त वाढवला आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होते.