Washim Drought | वाशिम जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा संत्रा बागांना; ७५ टक्के फळे परिपक्व होण्यापूर्वीच तोडण्याची वेळ

बाग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा; विहिरी, बोअरवेलची पाणीपातळी घटल्याने उत्पादनावर संकट
Washim Orange Farmers
Washim Orange FarmersPudhari
Published on: 
Updated on: 

Washim Orange Farmers

वाशिम : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पाण्याअभावी संत्रा बागा वाळण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी बाग वाचवण्यासाठी झाडांवरील सुमारे ७० ते ७५ टक्के फळे परिपक्व होण्यापूर्वीच तोडून टाकण्यास सुरुवात केली आहे. झाडांवर केवळ २५ ते ३० टक्के फळे ठेवून उपलब्ध पाण्यात बाग जगविण्याचा प्रयत्न केला जात आहे. वर्षभर बागेची निगा राखूनही फळे तोडून टाकण्याची वेळ आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा परिसर संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, या भागातील संत्र्यांना देशांतर्गत बाजारपेठेसह परदेशातही मागणी आहे. यंदा जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने संत्र्याच्या झाडांना मोठ्या प्रमाणात फळधारणा झाली होती. त्यामुळे यंदा चांगले उत्पादन मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने परिस्थिती बदलली आहे.

Washim Orange Farmers
Washim news: कौटुंबिक वादाचा भयंकर शेवट; रिसोडमध्ये पतीकडून पत्नीची धारदार शस्त्राने हत्या

पाण्याअभावी बागा वाचविण्याचे आव्हान

सध्या परिसरातील विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत घट झाली आहे. त्यामुळे संत्रा बागांना नियमित पाणी देणे कठीण बनले आहे. झाडांवर फळांची संख्या अधिक असल्यास त्यांना पाण्याची गरजही वाढते. उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता झाडांवरील सर्व फळे वाढविणे शक्य होणार नसल्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

उन्हाळ्यापर्यंत उपलब्ध पाणी पुरविण्याचे आव्हान असल्याने शेतकऱ्यांनी फळांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. झाडांवरील बहुतांश फळे काढून टाकल्यास उर्वरित झाडांचे संगोपन करणे शक्य होईल आणि बागा वाळण्यापासून वाचवता येतील, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे बाजारात विक्रीसाठी जाण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात संत्री तोडून फेकावी लागत आहेत.

वर्षभराचा खर्च पाण्यात; शेतकरी आर्थिक संकटात

संत्रा बागेची वर्षभर काळजी घेण्यासाठी शेतकऱ्यांना खते, कीटकनाशके, औषधे, मजुरी आणि सिंचनावर मोठा खर्च करावा लागतो. त्यानंतर फळधारणा झाल्यावर चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असते. मात्र, यंदा पाण्याच्या टंचाईमुळे झाडांवरील फळे काढून टाकावी लागत असल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे.

Washim Orange Farmers
Washim News | वाशिम जिल्हा कृषी कार्यालयातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याच्या जात वैधता प्रमाणपत्रावर आक्षेप!

मागील वर्षी अवकाळी पावसामुळे संत्रा पिकाचे नुकसान झाले होते. यंदा पावसाने ओढ दिल्याने पुन्हा एकदा संत्रा उत्पादकांसमोर संकट उभे राहिले आहे. सलग दोन वर्षे नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत असल्याने बागायतदारांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

एकीकडे उत्पादन खर्च वाढत आहे, तर दुसरीकडे पाण्याअभावी अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून, बागा वाचविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. यंदा संत्रा उत्पादनातून मिळणाऱ्या उत्पन्नाबाबत शेतकऱ्यांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news