

वाशिम : ठेकेदाराचे देयक मंजूर करून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना महावितरणच्या मंडळ कार्यालयातील लेखा व्यवस्थापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (५ नोव्हेंबर) रंगेहात पकडले. बबलू चौलीवार (वय ४२, रा. गोंदिया, सध्या रा. वाशिम) असे लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. या कारवाईमुळे महावितरण वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बबलू चौलीवार हे गेल्या तीन वर्षांपासून वाशिम येथील महावितरण मंडळ कार्यालयात लेखा व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. एका नोंदणीकृत ठेकेदाराने महावितरण अंतर्गत केलेल्या कामाचे देयक मंजूर करण्यासाठी चौलीवार यांनी संबंधित ठेकेदाराकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने ठेकेदाराने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वाशिम युनिटकडे तक्रार नोंदवली.
तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी करून सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना चौलीवार यांना पथकाने रंगेहात ताब्यात घेतले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिम युनिटचे पोलीस उपअधीक्षक जगदीश परदेशी यांच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात आली. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास सुरू आहे.