MSEDCL News | महावितरणच्या वीजयंत्रणेतील कामे खासगी व्यक्तींकडून केल्यास बडतर्फीची कारवाई

अनधिकृत मनुष्यबळाचा वापर टाळण्याचे निर्देश; अपघात झाल्यास दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
 Mahavitaran Private Workers Ban
Mahavitaran Pudhari
Published on: 
Updated on: 

Mahavitaran Private Workers Ban

वाशीम : महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेतील तांत्रिक आणि जोखमीची कामे खासगी व्यक्ती किंवा अनधिकृत मनुष्यबळाकडून करून घेतल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर बडतर्फी किंवा सेवासमाप्तीसारखी कठोर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी परिपत्रक काढून क्षेत्रीय मुख्य अभियंते आणि अधीक्षक अभियंत्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.

नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बदलणे, डीओ फ्यूज बदलणे, विद्युत वाहिनीतील बिघाड शोधणे, तांत्रिक दुरुस्ती करणे, ग्राहकांच्या वीजपुरवठ्याशी संबंधित तक्रारींचे निवारण करणे, वीजबिलांची वसुली करणे तसेच थकबाकीदार ग्राहकांचे मीटर काढणे आदी कामांची जबाबदारी महावितरणच्या तारमार्ग संवर्गातील प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ही कामे विद्युत सुरक्षा नियमांचे पालन करून अधिकृत तांत्रिक कर्मचाऱ्यांनीच करणे अपेक्षित आहे.

 Mahavitaran Private Workers Ban
Washim News: वाशिममध्ये सावत्र बापाने केला १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पोस्को अंतर्गत पोलिसात गुन्हा दाखल

मात्र, काही ठिकाणी महावितरणचे कर्मचारी स्वतः ही कामे न करता खासगी व्यक्ती किंवा अनधिकृत मनुष्यबळाच्या माध्यमातून करून घेत असल्याच्या तक्रारी मुख्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. हा प्रकार गंभीर असून, अशा व्यक्तींकडे आवश्यक तांत्रिक ज्ञान तसेच विद्युत सुरक्षेचे प्रशिक्षण नसण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्युत अपघात होण्याबरोबरच ग्राहक, कर्मचारी आणि महावितरणच्या मालमत्तेला धोका निर्माण होऊ शकतो.

‘सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी (Measures Relating to Safety and Electric Supply) Regulations, 2023’ मधील नियम ३ नुसार केवळ अधिकृत व्यक्तींनाच वीज वितरण सेवेशी संबंधित कामे करण्याची किंवा विद्युत वाहिन्या व उपकरणांवर काम करण्याची पात्रता आहे. त्यामुळे महावितरणकडून अधिकृतपणे नामनिर्देशित न केलेल्या किंवा अपात्र खासगी व्यक्तीकडून वीजयंत्रणेवरील कामे करून घेणे हे अनधिकृत कृत्य ठरते. महावितरणच्या सेवाविनियमांनुसारही ही बाब गंभीर गैरवर्तणुकीच्या स्वरूपात येते.

 Mahavitaran Private Workers Ban
Washim News | मालेगाव तालुक्यातील शिवारात जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी

या पार्श्वभूमीवर, अनधिकृत मनुष्यबळाचा वापर केल्याचे किंवा त्यामुळे दुर्घटना, अपघात अथवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे आढळल्यास तातडीने चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सेवाविनियमांनुसार बडतर्फी किंवा सेवासमाप्तीसारखी कठोर कारवाई केली जाणार आहे.

क्षेत्रीय मुख्य अभियंते आणि अधीक्षक अभियंत्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात वीज वितरणाची कामे करताना कोणत्याही परिस्थितीत खासगी किंवा अनधिकृत मनुष्यबळाचा वापर होत नाही, याची नियमितपणे खातरजमा करावी, असेही निर्देश संचालक धनंजय औंढेकर यांनी दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news