

Karanja Municipal Council
वाशिम : कारंजा नगर परिषदेच्या राजकीय वर्तुळात महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. प्रभाग क्रमांक ४ (अ) मधून निवडून आलेले एआयएमआयएमचे नगरसेवक हुसैन जंगली पप्पूवाले (बंदूकवाले) यांना दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी अपात्र घोषित केले आहे. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे.
या प्रकरणी तक्रारदार सुभान बुद्धू कामनवाले यांनी ३१ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली होती. निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात अपत्यसंख्येबाबत चुकीची माहिती देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता.
या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने सविस्तर चौकशी केली. त्यासाठी संबंधितांचे रेशन कार्ड, आधार कार्ड, जन्मनोंदी, लसीकरणाच्या नोंदी, शासकीय रुग्णालयातील प्रसूतीविषयक नोंदी तसेच विधानसभा मतदार यादीतील नोंदींची पडताळणी करण्यात आली. या कागदपत्रांच्या आधारे संबंधित नगरसेवकांना चार जिवंत अपत्ये असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या शपथपत्रातील माहिती वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम १६ (१) (क) सह कलम ४४ अन्वये जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी २३ नोव्हेंबर २०२६ रोजी तक्रारदाराचा अर्ज मंजूर केला. त्यानुसार संबंधित नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश देण्यात आला. हा आदेश २६ नोव्हेंबर २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला.
या प्रकरणात तक्रारदार सुभान बुद्धू कामनवाले यांच्या वतीने ॲड. एस. डी. पोफळे यांनी, तर गैरअर्जदार हुसैन जंगली पप्पूवाले यांच्या वतीने ॲड. ए. जे. उंडाळ यांनी बाजू मांडली.