El Nino Impact | शेतकऱ्यांनी पेरणीची घाई टाळावी; एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामासाठी नियोजन करण्याचे आवाहन

संभाव्य दुष्परिणाम टाळण्यासाठी तांत्रिक उपाययोजनांचा अवलंब करण्याचे कृषी तज्ज्ञांचे आवाहन
Washim Farmers Kharif Season Advisory
Washim Farmers Kharif Season Advisory AI photo
Published on
Updated on

Washim Farmers Kharif Season Advisory

वाशिम : हे वर्ष एल निनोच्या प्रभावाखाली राहण्याची शक्यता असल्याने आगामी खरीप हंगामावर त्याचे परिणाम जाणवू शकतात, असा इशारा कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. यामुळे मान्सूनला उशिरा सुरुवात होणे, सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणे, पावसाचे अनियमित वितरण, दीर्घ कोरडे कालखंड, तापमानवाढ आणि जलसाठ्यात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परिणामी खरीप पिकांच्या पेरणीपासून उत्पादनापर्यंत विविध अडचणी निर्माण होऊ शकतात.

तज्ज्ञांच्या मते, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई टाळावी. साधारणपणे ७५ ते १०० मिमी पाऊस पडून जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाल्यानंतरच कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने पेरणी करणे फायदेशीर ठरेल. धूळपेरणी किंवा अवकाळी पावसाच्या भरवशावर पेरणी करण्याचे टाळावे.

Washim Farmers Kharif Season Advisory
Shiv Sena Protest Washim | संजय राऊत यांच्या वक्तव्याने संतप्त झालेल्या शिंदे गटाचे वाशिममध्ये 'जोडे मारो' आंदोलन

कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या बहुपीक व आंतरपीक पद्धतींचा अवलंब करावा. पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवणक्षमता तपासून पीएसबी, रायझोबियम आणि ट्रायकोडर्मा यांसारख्या जैविक घटकांद्वारे बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. तसेच रुंद सरी-वरंबा आणि बेड पद्धतीचा वापर केल्यास पावसाच्या पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन करता येते.

शेतात कंटूर बांध, कंपार्टमेंट बंडिंग, आच्छादन तसेच जलसंधारणाच्या इतर उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. पेरणीस विलंब झाल्यास कमी कालावधीत येणारे आणि दुष्काळ सहनशील वाण निवडावेत, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.

Washim Farmers Kharif Season Advisory
Washim News : २६ वर्षीय ऑटोचालकाने घरात गळफास घेवून जीवन संपविले; रिसोडमधील घटना

सोयाबीनसाठी पीडीकेव्ही आंबा, पीडीकेव्ही यलो गोल्ड आणि जेएस-३३५ हे मध्यम कालावधीचे वाण, तर जेएस-९३०५, एमएयुएस-६१२ आणि एमएयुएस-१५८ हे लवकर येणारे वाण उपयुक्त ठरू शकतात. तुरीसाठी पीकेव्ही तारा, बीडीएन-७१६, बीडीएन-२०१३-२ (रेणुका) तसेच सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास बीडीएन-२०१३-४१ (गोदावरी) या वाणांची निवड करता येईल. मात्र, वाणांची निवड स्थानिक कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावी.

पिकांना खते देताना माती परीक्षणावर आधारित एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अवलंब करावा. सेंद्रिय आणि जैविक खतांचा वापर वाढवून रासायनिक खतांचा संतुलित वापर करणे आवश्यक आहे. यामुळे जमिनीचे भौतिक व जैविक गुणधर्म सुधारण्यास मदत होईल.

पावसात दीर्घ खंड पडल्यास संरक्षित सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा. कोरडवाहू परिस्थितीत तज्ज्ञांच्या सल्ल्याने पोटॅशियम नायट्रेट (१३:०:४५) ची फवारणी केल्यास पिकावरील ताण कमी करण्यास मदत होऊ शकते.

Washim Farmers Kharif Season Advisory
Washim Shiv Sena UBT news | 'ऑपरेशन टायगर'नंतर ठाकरे गट आक्रमक! खासदार संजय देशमुखांविरोधात शिवसैनिकांचा संताप

कीड व रोग व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. यामध्ये पक्षी थांबे, कामगंध सापळे, पिवळे चिकट सापळे, वनस्पतीजन्य कीटकनाशके, प्रतिकारक्षम वाण आणि बीजप्रक्रिया यांचा समावेश होतो. रासायनिक कीटकनाशकांचा वापर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिफारस केलेल्या प्रमाणातच करावा.

एल निनोच्या संभाव्य प्रभावाचा सामना करण्यासाठी योग्य तांत्रिक नियोजन, जलसंधारण, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन या बाबींवर भर देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी विद्यापीठे आणि कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र, करडा येथील कीटकशास्त्रज्ञ तथा कृषी महाविद्यालय, रिसोडचे तांत्रिक समन्वयक राजेश डवरे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news