वाशिम: डोक्यात फावडे मारल्याने गंभीर जखमी शेतकऱ्याचा मृत्यू

मदन झापा चव्हाण
मदन झापा चव्हाण

वाशिम: पुढारी वृत्तसेवा : शेतातील गोटे वेचून आमच्या शेताच्या धुर्‍यावर का टाकले म्हणत 7 ते 8 जणांनी एका शेतकऱ्याला बेदम मारहाण करून डोक्यात लोखंडी फावडे मारून गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (१५) सकाळी आठ च्या दरम्यान शिरपूटी गावाच्या शेतशिवारत घडली होती. दरम्यान गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचा अकोला येथे उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. मदन झापा चव्हाण (वय ४७) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वाशिम तालुक्यातील शिरपुटी येथील शेतकरी मदन झापा चव्हाण (वय ४७) यांच्याकडे दीड एकर शेती आहे. शनिवारी सकाळी ते स्वतःच्या शेतात काडी कचरा वेचण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांच्या शेताला लागून असलेल्या धीरज उल्हास जाधव यांच्या मालकीच्या शेतात धीरज उल्हास जाधव, संदेश उल्हास जाधव, कविता उल्हास जाधव, राजू मोहन जाधव, सुमित संतोष चव्हाण, रेणुका संतोष चव्हाण, संतोष हाकम चव्हाण, गंगाराम राजू सिंग जाधव हे उभे होते.

त्यांनी मदन चव्हाण याला आपल्या शेतात बोलावून 'तुझ्या शेतातील गोटे वेचून आमच्या धुर्‍यावर का टाकले', असे म्हणत शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी मदन याने मारहाण करणाऱ्यांच्या तावडीतून कसाबसा जीव वाचवत बाजूच्या शेतात काम करत असलेल्या स्वतःच्या भावाच्या पत्नीकडे धाव घेतली. मारहाण करणाऱ्या पैकी धीरज आणि संदेश मागून पळत गेले आणि संदेश जाधवने मदनाला पकडले असता धीरज जाधवने त्याच्या हातात असलेल्या फावड्याने मदनच्या डोक्यात जोरदार मारले. यात मदन गंभीर जखमी होऊन जागीच बेशुद्ध झाला.

हे पाहून बाजूच्या शेतात काम करत असलेली मदनच्या भावाची पत्नी मदन कडे पळत गेली. तिला मदन गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. तिने तिच्या पतीला फोन करून सर्व माहिती दिली असता मदनचा भाऊ जनार्दन झापा चव्हाण आणि त्यांचा मुलगा तत्काळ शेतात जाऊन जखमी मदन चव्हाणला वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सदर घडणेवरून जनार्दन झापा चव्हाण यांनी अनसिंग पोलीस स्टेशनला तक्रार दिली. यावरून पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा नोंदविला होता.

मदन चव्हाण यांची प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ अकोला येथे हलविण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी त्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यावरून मारहाण करणाऱ्या आरोपीवर खुनाचा गुन्हा नोदवून त्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी तक्रारदार जनार्दन चव्हाण यांनी केली केली होती. यावरून अनसिंग पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला असून आरोपी अद्याप फरार आहेत. अनसिंग पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news