

Washim Investment Conclave
वाशिम : जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राला चालना देण्यासह गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण करणे, स्थानिक उत्पादनांची निर्यात वाढविणे आणि रोजगारनिर्मितीला गती देण्यासाठी वाशिम येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-२०२६ आयोजित करण्यात आली आहे.
पालकमंत्री तथा राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या उपस्थितीत ही परिषद १४ ऑगस्ट २०२६ रोजी स्व. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्र, काटा रोड, वाशिम येथे होणार आहे.
या परिषदेत जिल्ह्यातील गुंतवणूकदार, उद्योजक आणि विविध व्यवसाय क्षेत्रातील प्रतिनिधींना एकत्र आणून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच गुंतवणूकदार आणि शासन यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात येणार असून, त्यातून जिल्ह्यात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांनी जिल्हा उद्योग केंद्र, वाशिम यांच्याशी संपर्क साधून MoU करून घ्यावा आणि १४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या गुंतवणूक परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त (उद्योग व सेवा) शिवाजी कासारकर यांनी केले आहे.