

वाशीम : रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर झालेल्या अंतिम देयकासाठी ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत रिधोरा सरपंच सौ. वच्छला बबन खुळे व त्यांचे पती बबन सिताराम खुळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाशिमच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार हा रिधोरा, येथिल रहिवासी असून यांच्या शेतात रोजगार हमी योजनेंतर्गत विहिरीच्या बांधकामासाठी शासनाकडून १,४१,३०८ रुपयांचा चेक मंजूर झाला होता. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अंतिम देयकाचा चेक जारी करण्यासाठी सरपंच वच्छला खुळे यांनी तक्रारदारास ५ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
त्यानंतर ९ सप्टेंबर २०२५ रोजी पडताळणी करण्यात आली. पडताळणीत लाच मागणीची खात्री झाल्यानंतर त्याच दिवशी हॉटेल जय गजानन उपहारगृह, जुना बायपास, नागपूर–छत्रपती संभाजीनगर रोड, मालेगाव येथे सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे सरपंच यांचा पती बबन खुळे यांनी तक्रारदाराकडून ५ हजार रुपये लाच स्वीकारले. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना पंचासमक्ष रंगेहात पकडले. या प्रकरणात आरोपीविरुद्ध मालेगाव पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम ७, ७(अ), १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अलका गायकवाड (ला.प्र.वि. वाशिम) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत पो. हवा. नितीन टवलारकर, विनोद मार्कंडे, राहुल व्यवहारे, योगेश खोटे, विनोद अवगळे, रविंद्र घरत, चा.पो.कॉ. नाविद शेख यांनी सहभाग घेतला. या मोहिमेचे पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक जगदीश परदेशी यांनी केले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांचे प्रतिनिधी शासकीय कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास त्वरित तक्रार नोंदवावी. अशा धाडसी कारवायांमुळे भ्रष्टाचार रोखण्यास मोठी मदत होत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.