

Bharatiya Jain Sanghatana Educational Initiative
वाशिम : भारतीय जैन संघटना (बीजेएस) महाराष्ट्र राज्याच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींच्या शैक्षणिक पुनर्वसनासाठी अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राज्यभरात प्रभावीपणे सुरू करण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पुणे येथील वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात प्रवेश देण्यात येणार असून, त्यांच्या शिक्षणासोबतच निवास, भोजन, गणवेश, शैक्षणिक साहित्य आणि इतर आवश्यक सुविधा पूर्णतः मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या माध्यमातून आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळून त्यांच्या भविष्याला नवी दिशा मिळणार आहे.
मागील दोन वर्षांत आत्महत्या झालेल्या शेतकरी कुटुंबातील इयत्ता पाचवी,सहावी व सातवीमध्ये आता प्रवेश घेत असलेल्या मुला-मुलींना या प्रकल्पात प्रवेश देण्यात येणार असून त्यांचे बारावीपर्यंतचे संपूर्ण शिक्षण भारतीय जैन संघटनेमार्फत विनामूल्य करण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पात्र विद्यार्थ्यांची माहिती प्राप्त करण्यात आली आहे.
भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते व सेवक संबंधित कुटुंबांच्या घरी गावातील सरपंच किंवा प्रतिष्ठित व्यक्ती सोबत घेऊन जाऊन प्रत्यक्ष भेट घेणार असून विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना या योजनेची सविस्तर माहिती व्हिडिओ व छायाचित्रांच्या माध्यमातून समजावून सांगण्यात येणार आहे.
घरातील कर्ता शेतकरी आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण कुटुंब मानसिक,सामाजिक व आर्थिक संकटात सापडलेला असतो.अशा कठीण परिस्थितीतही मुला-मुलींचे शिक्षण थांबता कामा नये,त्यांनी शिक्षण घेऊन भविष्यात स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे उचलली पाहिजे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे भारतीय जैन संघटनेचे राज्याध्यक्ष केतनभाई शहा यांनी सांगितले.
आपल्या गावात असे कोणी कुटुंब असेल तर त्यांनी रविवार दि.३१ मे पूर्वी जिल्हाध्यक्ष सौरभ जैन, जिल्हा सचिव पंकज बांडे व सुजलाम सुफलाम जिल्हा समन्वयक शिखरचंद बागरेचा यांच्याशी संपर्क साधावा. तसेच इच्छुक व गरजू आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांनी या शैक्षणिक पुनर्वसन उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.