

वाशिम : आईच्या मृत्यूचा दाखला देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या ग्रामपंचायत शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)ने रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. राजेश बळीराम बाविस्कर (वय ५४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो डोंगरकिन्ही (ता. मालेगाव) येथील ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून कार्यरत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या आईचे निधन झाले होते. कुटुंबातील शेतजमिनीची हिस्सेवाटणी करण्यासाठी त्यांना आईच्या मृत्यू दाखल्याची आवश्यकता होती. यासाठी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात चौकशी केली असता शिपाई राजेश बाविस्कर यांनी "दाखला मी तयार करून देतो, मात्र त्यासाठी अडीच हजार रुपये द्यावे लागतील; पैसे दिले नाहीत तर दाखला मिळणार नाही," अशी मागणी केल्याचे सांगितले जाते.
शासकीय कामासाठी लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिम येथे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने ११ मार्च २०२६ रोजी पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी केली. पडताळणीदरम्यान आरोपीने लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर एसीबीने सापळा रचला. तडजोडीनंतर आरोपीने २ हजार रुपये स्वीकारण्यास मान्यता दिली. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारून ती शर्टाच्या खिशात ठेवताच दबा धरून बसलेल्या पथकाने बाविस्कर यांना जागीच ताब्यात घेतले.
आरोपीच्या अंगझडतीमध्ये लाचेची २ हजार रुपयांची रक्कम आणि मोबाईल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मालेगाव पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ आणि ७-अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
ही कारवाई अमरावती एसीबीचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन्द्र शिंदे आणि पोलीस उपअधीक्षक जगदीश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अल्का गायकवाड, पोलीस निरीक्षक बालाजी तिप्पलवाड तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.