

वाशिम: वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची तीव्रता प्रचंड वाढली असून नागरिक हैराण झाले होते. मात्र, आज सकाळपासून वातावरणात बदल जाणवत असून दुपारी मालेगाव तालुक्यासह जिल्ह्याच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.
या अचानक झालेल्या पावसामुळे तापमानात घट होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला आहे त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे काढणीस आलेल्या उन्हाळी मूग, भुईमूग यासारख्या पिकांसह आंबा व भाजीपाला पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे.