

Gang attacks hotel owner after he asks for payment for Chinese food
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : हॉटेलमधून चायनीज पदार्थांचे पार्सल घेतल्यानंतर बिलाचे पूर्ण पैसे नाहीत, असे सांगणाऱ्या ग्राहकाला दुकानदाराने पूर्ण पैशांची मागणी करताच वाद उफाळला. संतापलेल्या आरोपींनी हॉटेल चालकाला जबर मारहाण करत हातातील लोखंडी कड्याने थेट उजव्या डोळ्यावर प्रहार करून गंभीर जखमी केले. आणखी ३ ते ४ गुंडांना सोबत आणून दुकानात तुफान राडा घालत वडिलांना शिवीगाळ करून स्टीलचे टेबल व बाकडी अंगावर फेकून नुकसान केले, तसेच मध्यस्थी करणाऱ्या पुतण्यावर फायटरने वार करून पळ काढला. हा थरार मंगळवारी (दि.२०) रात्री ९:४० वाजता प्रतापनगर स्मशानभूमीत रस्त्यावर घडली.
याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात राहुल बीडकर, प्रशांत शिंदे आणि त्यांच्या इतर ५ ते ६ साथीदारांविरुद्ध दंगल माजवणे, शस्त्राने मारहाण व तोडफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हॉटेल व्यावसायिक मनोज भैरूलाल कछवाह (५२, रा. प्रतापनगर, स्मशानभूमी रोड, उस्मानपुरा) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे प्रतापनगर स्मशानभूमी रोडवर चायनीजचे हॉटेल आहे. मंगळवारी रात्री पावणेदहा वाजेच्या समारास राहल बीडकर प्रशांत शिंदे आणि त्यांचे दोन साथीदार दुकानावर आले.
त्यांनी चायनीजचे पार्सल घेतले. बिल भरण्याची वेळ आली असता, आमच्याकडे बिलाचे पूर्ण पैसे नाहीत, असे आरोपींनी सांगितले. यावर कछवाह यांनी, मला बिलाचे पूर्ण पैसे द्या अशी मागणी केली या क्षल्लक कारणावरून आरोपींनी कछवाह यांच्याशी वाद घालून त्यांना शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. एका आरोपीने हातातील कड्याने कछवाह यांच्या थेट उजव्या डोळ्यावर जोरदार वार केला, ज्यामुळे डोळ्याला गंभीर दखापत होऊन ते रक्तबंबाळ झाले.
हॉटेलवर टोळक्याचा धुडगूस
पहिल्या हल्ल्यानंतर आरोपी तिथून निघून गेले; मात्र काही वेळातच त्यांनी आणखी ३ ते ४ साथीदारांना बोलावून घेतले आणि कछवाह यांच्या हॉटेलवर पुन्हा हल्ला चढवला. आरोपींनी कछवाह यांच्या वृद्ध वडिलांना शिवीगाळ केली. तसेच दुकानातील जड स्टेनलेस स्टीलचे टेबल आणि बसण्याचे बाकडे उचलून थेट अंगावर फेकून मारले आणि हॉटेलच्या साहित्याची मोठी नासधूस केली. यावेळी कछवाह यांचा पुतण्या भांडण सोडवण्यासाठी पुढे आला असता, आरोपींनी त्याच्या पाठीवर फायटरने मारून जखमी करत आरोपी पसार झाले. पुढील तपास सहायक फौजदार भिडे करत आहेत.
घाटी रुग्णालयासमोर भावाला मारहाण
प्रतापनगर येथे कछवाह यांना जबर मारहाण केल्यानंतर त्यांना घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे गेलेले त्यांचे बंधू विजय भैरवलाल कछवाह (५०) यांना आणि त्यांच्या मुलाला तुझ्या भावाने आमच्याविरुद्ध पोलिसात तक्रार का दिली असे म्हणत आरोपी अतुल बीडकर, राहुल बिडकर, अनिल जाधव प्रशांत शिंदे या आरोपींनी फायटरने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना रात्री ११:३० वाजता घाटी अपघात विभागासमोर घडली. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांत दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.