
Maharashtra Cabinet Decision Karanja Civil Court
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे वरिष्ठ स्तरावरील दिवाणी न्यायालय स्थापन करण्याच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावाला महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने अखेर मंजुरी दिली आहे. राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाल्याने कारंजा आणि परिसरातील नागरिकांना आता स्थानिक पातळीवरच जलद न्याय मिळण्याची सोय उपलब्ध होणार आहे.
या नवीन न्यायालयासाठी एकूण २८ नवीन पदांची निर्मिती केली जाणार असून, यासाठी १.७६ कोटी रुपयांचा खर्च शासनाच्या निधीतून केला जाईल. या निर्णयामुळे न्यायप्रक्रिया अधिक गतिमान होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
या न्यायालयाच्या स्थापनेमागे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री तथा क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ मंत्री दत्तात्रेय भरणे तसेच आमदार सई प्रकाश डहाके यांचे विशेष प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत. दोन्ही नेत्यांनी वेळोवेळी मंत्रालयात पाठपुरावा करून या न्यायालयाच्या स्थापनेसाठी आवश्यक असलेला प्रस्ताव पुढे नेला होता, ज्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय शक्य झाला आहे.
या निर्णयामुळे वाशिम जिल्ह्यात न्याय व्यवस्था अधिक बळकट होणार असून, स्थानिक पातळीवरच न्याय सुविधा उपलब्ध झाल्याने वकील, नागरिक आणि कर्मचारी वर्गासाठीही ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. मंत्रिमंडळाच्या या निर्णयाबद्दल जिल्ह्यातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.