

Shirpur Jain youth dead body
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथे सोमवारी नाल्याला आलेल्या पुरात एक जण वाहून गेल्याची घटना घडली होती. अखेर आज (दि.१६) सकाळी या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. रवि नंदू राऊत (वय 32) असे या युवकाचे नाव असून तो शेलगाव बगाडे येथील रहिवासी आहे.
तीन दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे अनेक नदी आणि नाल्यांना मोठे पूर आले आहेत. दरम्यान, वाशिमच्या शिरपूर जैन येथील नाल्यावरून रवि राऊत हा युवक सायंकाळी ७ च्या सुमारास आपल्या घरी शेलगावकडे जात होता. यावेळी अचानक शिरपूर येथील नाल्याच्या पुलावरून पाणी वाहू लागले. या पाण्याच्या प्रवाहात रवि वाहून गेला. त्याचा रात्री उशिरा पर्यत शोध घेतला असता तो मिळून आला नाही. अखेर आज सकाळी रविचा मृतदेह नाल्यापासून 50 फुटांवर आढळून आला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.