

Accident News | रिसोड पोलिस स्थानकात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल संतोष धोंडूराम खोडके (वय 48) यांचा झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाल्याने रिसोड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 23 नोव्हेंबरच्या सायंकाळी सुमारे 6.15 वाजता रिसोड–शेगाव–खोडके मार्गावर पवारवाडी जवळ हा अपघात झाला. सरकारी कामानिमित्त पवारवाडीकडे जात असताना हा दुर्दैवी प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
संतोष खोडके हे त्या दिवशी आपल्या बुलेट दुचाकीवरून कामानिमित्त बाहेर पडले होते. पवारवाडीच्या आसपास पोहोचताच अचानक झालेल्या धडकामुळे ते गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती एका नागरिकाने तत्काळ रिसोड पोलिस ठाण्यात दिली. माहिती मिळताच ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी कर्मचारी दलासह घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.
अपघातानंतर खोडके यांना तातडीने उपचारासाठी रिसोड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आला. 24 नोव्हेंबर रोजी शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमात अंतिम संस्कार करण्यात आले. निजामपूर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले गेले.
संतोष खोडके यांच्या मृत्यूने त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. कर्तव्यदक्ष, शांत स्वभावाचा आणि मनमिळावू अधिकारी म्हणून ते ओळखले जात होते. रिसोड पोलिस स्थानकातील अनेकांना ते मार्गदर्शन करीत असत. त्यांच्या अचानक मृत्यूने पोलिस दलात दुखःचं सावट पसरलं आहे.
या अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. धडक कशी झाली? कोणत्या वाहनाशी अपघात झाला? कोणी निष्काळजीपणे वाहन चालवत होते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तपासातूनच मिळणार आहेत. रिसोड पोलिस अधिक तपास करत असून आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तसेच प्रत्यक्षदर्शींची माहिती गोळा केली जात आहे.
संतोष खोडके यांना दोन मुले असून कुटुंबाचा आधारस्तंभ असलेल्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याने त्यांच्या घरी शोककळा पसरली आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी खोडके यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत कुटुंबीयांना धीर दिला आहे.