

Karanja Imtiaz Jaleel Rally
वाशीम : एमआयएमचे नेते तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांना कथितरीत्या जीवे मारण्याची धमकी मिळाल्याच्या प्रकरणाचे पडसाद कारंजा लाड शहरात उमटले. या घटनेचा निषेध नोंदवत जलील यांच्या समर्थनार्थ तसेच धमकी देणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हजारो नागरिकांनी मंगळवारी कारंजा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.
मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हाजी मोहम्मद युसूफ सेठ पूंजानी यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. कारंजा शहरातील विविध भागांतून नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले. इम्तियाज जलील यांना मिळालेल्या कथित धमकीबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त करत या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली.
धमकी देणाऱ्या व्यक्तींचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या नेत्यांना अशा प्रकारच्या धमक्या देणाऱ्यांवर प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी भूमिकाही आंदोलकांनी मांडली.
या मोर्चात एमआयएमचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शहरातील विविध भागांतील नागरिक सहभागी झाले होते. हजारो नागरिकांच्या उपस्थितीमुळे तहसील कार्यालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. इम्तियाज जलील यांच्या समर्थनार्थ कारंजा शहरातील नागरिकांनी एकत्र येत प्रशासनाचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले.