Defamation Case Washim | काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह सात जणांविरोधात 100 कोटींचा मानहानी दावा दाखल
100 Crore Defamation Suit Washim District Court
वाशिम: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपा पक्ष आणि माझी वैयक्तिक केलेल्या मानहानीप्रकरणी भाजपचे वाशिम जिल्हा निवडणूक प्रमुख राजू पाटील राजे यांनी विजय वाडेट्टीवार आणि वाशिम येथील खंडणी प्रकारणाचा आरोप असलेले हरीश गोवर्धनदास सारडा, तेजराव किसनराव इनामदार, पंकज अनिल इंगोले, आनंद अरुण खेर्डे, मराठी वृत्तवाहिनी अशा सात जणांविरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानी दावा दाखल केला आहे. याबाबतची माहिती त्यांनी आज (दि. 23) शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
राजू पाटील राजे यांनी सांगितले की, दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी विजय वडेट्टीवार यांनी सार्वजनिक माध्यमांसमोर माझ्याविरोधात गंभीर आरोप केले होते. वाशिममध्ये नकली नोटा प्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल असूनही अटक झाली नाही तसेच शासन आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र, हे सर्व आरोप खोटे व निराधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणी आपण 3 जानेवारी 2026 रोजी वडेट्टीवार यांना कायदेशीर नोटीस बजावून 15 दिवसांत खुलासा करण्यास व सार्वजनिक माफी मागण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी ना खुलासा केला ना माफी मागितली, असेही पाटील यांनी सांगितले.
त्यामुळे 18 मार्च 2026 रोजी वाशिम जिल्हा सत्र न्यायालयात 100 कोटी रुपयांचा मानहानी दावा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने हा दावा स्वीकारला आहे. या प्रकरणाचा दावा क्रमांक 13/2026 असून संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे.
पाटील राजे म्हणाले की, माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे असून याविरोधात न्यायालयात लढा देणार आहे. ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी ते न्यायालयात सादर करावेत, अन्यथा जनतेची माफी मागावी.
यावेळी त्यांनी वाशिम जिल्ह्यातील जनतेला आपल्या सार्वजनिक कार्याबाबत पारदर्शकता असल्याचे सांगत, खोट्या आरोपांना कायदेशीर मार्गानेच उत्तर देणार असल्याचे स्पष्ट केले.या प्रकरणमुळे भाजप–काँग्रेसमध्ये राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.येत्या काळात या प्रकरणावरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत असून, न्यायालयीन लढतीतून सत्य समोर येणार आहे.

