वाशिम; पुढारी वृत्तसेवा : समाजात शांतता व सुव्यवस्था नांदावी व अवैध धंद्यांवर प्रतिबंध रहावा यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे सतत विशेष मोहिमा राबवत कारवाया सुरु असतात. काहीजण छुप्या पद्धतीने अवैध धंदे करण्याचा प्रयत्न करतात अशा आरोपींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे (IPS) यांनी दिले आहेत.
त्या अनुषंगाने मंगळवारी (दि.7) पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे यांना मेडशी शेतशिवारातील संत्र्याच्या मळ्यात असलेल्या बंद घरात राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपीटल्स संघांच्या IPLसामन्यावर फोनद्वारे हारजीतचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुषंगाने पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पंचांसमक्ष धाड टाकून ०५ आरोपींकडून सुमारे ४,३२,९४०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मेडशी येथील रज्जाक शेख चांद यांच्या संत्र्याच्या मळ्यातील असलेल्या बंद घरात आरोपी १) आकाश संतोष रावत (वय २६ वर्षे), २) ललित संतोष रावत, (वय २४ वर्षे), ३) शेख समीर शेख कलीम (वय १९ वर्षे), ४) कृष्णा धनराज चव्हाण (वय २५ वर्षे),५) पांडुरंग सदाशिव मांडवगडे (वय ३७) सर्व रा.मेडशी हे राजस्थान रॉयल्सविरुद्ध दिल्ली कॅपीटल्स IPL सामन्यावर हार-जीतचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. आरोपीकडून १ लॅपटॉप, १ AC, १ LED टि.व्ही., २ मोटारसायकल, १ फ्रिज, १ टेबल, ६ खुर्च्या, २ पेन ड्राईव्ह, १९ मोबाईल संच, १ कपाट, १ सेट ऑफ बॉक्स असा एकूण ४,६२,९४०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर ०६ आरोपींवर पो.स्टे.मालेगाव येथे गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे (IPS), अपर पोलिस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.प्रवीण धुमाळ, पोउपनि.रविकांत देशमुख, पोहवा.दिनेश काकडे, पोकॉ.समाधान इंगोले, दादाराव भोयर यांनी पार पाडली. सर्व जनतेस सुजाण नागरिक या नात्याने अशा प्रकारची काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्षास माहिती द्यावी, त्या इसमाचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.