

वाशिम : वाशिम तालुक्यातील देगाव तांडा येथे दि. 17 सप्टेंबर रोजी एका वृद्ध महिलेचे निधन झाले. त्यांना अंत्यसंस्काराला नेल्यानंतर स्मशानभूमीत अंत्यसंस्काराचे शेड नसल्यामुळे उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागले. पावसामुळे शव पेटत नसल्यामुळे अनंत अडचणींचा सामना गावकऱ्यांना करावा लागला. या प्रकारामुळे गावकऱ्यांनी शासनाप्रती प्रचंड रोष व्यक्त केला.
आजही जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये स्मशानभूमीसाठी स्वतंत्र जागा नाही. तर ज्या गावांमध्ये स्वतंत्र जागा आहे तिथे अंत्यसंस्काराचे शेड बांधलेले नाहीत. अनेक गावांमधील ही परिस्थिती आहे. देगाव तांडा येथील येथील स्मशानभूमीत टीन शेड बांधलेले नाही. अशातच दि. 17 सप्टेंबर रोजी दुपारी 1:00 वाजता गावातील वृद्ध महिला स्व. धरमीबाई किसन राठोड 85 यांचे निधन झाले.
दरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे पाऊस थांबेल या अपेक्षेवर सायंकाळी 6 वाजेपर्यंत गावकऱ्यांनी प्रतीक्षा केली. मात्र तरीही पाऊस न थांबल्यामुळे गावकऱ्यांनी अंत्यसंस्काराची तयारी केली. मृतात्म्यास चिताग्नी दिल्यानंतर पावसाने जोर पकडल्यामुळे प्रचंड अडथळा निर्माण झाला. यावेळी सरनावर पेट्रोलचा मारा करण्यात आला. तरी सुद्धा सरन पेटण्यास अडथळा येत होता.
यावेळी उपस्थित नागरिकांनी शासनाप्रती प्रचंड रोष व्यक्त केला. जोपर्यंत गावात स्मशानभूमीचे शेड व इतर व्यवस्था निर्माण होत नाहीत तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय गावकरी घेणार असल्याचे बोलले जात आहे. ग्रामीण नागरिकांच्या मृत्यूनंतरही मरणयातना संपता संपत नसल्यामुळे शासनाच्या एकूणच व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. जिल्हाधिकारी याबाबत काय दखल घेतात याकडे गावाकऱ्यांचे लक्ष लागले आहे.