

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘अर्णब’ चक्रीवादळाने आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर मोठी हानी घडवली. समुद्राच्या वाढत्या तापमानामुळे या वादळाची तीव्रता अल्पावधीत वाढली. प्रशांत महासागरातील अल निनोच्या प्रभावामुळे चक्रीवादळांच्या निर्मितीचे क्षेत्र, त्यांची दिशा आणि वेग यांमध्ये बदल होत असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळेच भारताच्या किनारपट्टीवरील आपत्ती व्यवस्थापनाला अधिक व्यापक आणि वैज्ञानिक स्वरूप देण्याची गरज आहे. हवामानाचा अचूक अंदाज वर्तविण्यासाठी अत्याधुनिक उपग्रह, महासंगणक, रडार यंत्रणा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी जीवितहानी रोखण्यात बऱ्याच प्रमाणात यश येत असले तरी अचल संपत्ती किंवा मालमत्तांचे, शेतीचे होणारे नुकसान टाळता येत नाही. दरवर्षी मान्सूनपूर्व आणि मान्सूनोत्तर काळात या समुद्रात कमी दाबाची क्षेत्रे तयार होतात. त्यांपैकी काहींचे रूपांतर तीव्र चक्रीवादळांत होते. किनारपट्टीवरील लाखो नागरिकांचे जीवन, शेती, मासेमारी, उद्योग आणि पायाभूत सुविधांना या वादळांचा फटका बसतो. अलीकडच्या काळात मात्र चक्रीवादळांच्या स्वरूपात होणारे बदल हवामानशास्त्रज्ञांसाठी चिंतेचा विषय बनले आहेत.
चीन-म्यानमार परिसरातील प्रतिचक्रीय वातावरणीय व्यवस्था, पश्चिमेकडील जोरदार वारे आणि बंगालच्या उपसागरात दक्षिणेकडील कमी दाबाचे क्षेत्र यांच्या परस्पर प्रभावामुळे वादळाचा जमिनीवर प्रवेश होण्याची प्रक्रिया जवळपास सहा तास लांबली. त्यामुळे वादळ काही काळ जवळजवळ स्थिर राहिल्यासारखे दिसले. ही घटना चक्रीवादळांच्या मार्गाचा अंदाज वर्तविताना अनेक वातावरणीय शक्तींचा विचार करणे किती आवश्यक आहे, हे स्पष्ट करते. चक्रीवादळांच्या निर्मितीमागे समुद्रातील उष्णता ही प्रमुख ऊर्जा असते. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान साधारणतः २६.५ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक असताना चक्रीवादळांच्या विकासासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. मात्र, पृष्ठभागाचे तापमान हा एकमेव घटक नाही. समुद्राच्या काही खोलीपर्यंत साठलेली उष्णता, वातावरणातील आर्द्रता, उंचीनुसार वाऱ्यांच्या वेगातील आणि दिशेतील बदल, तसेच वातावरणातील अस्थिरता यांचा एकत्रित परिणाम होतो. समुद्रातील उबदार पाण्याचे बाष्पीभवन होते. ही वाफ वर जाऊन थंड झाल्यानंतर संघननाच्या प्रक्रियेत उष्णता मुक्त होते. त्यामुळे वादळाच्या केंद्राजवळील हवेचा ऊर्ध्वगामी प्रवाह अधिक शक्तिशाली होतो. अनुकूल परिस्थितीत या प्रक्रियेमुळे चक्रीवादळाची तीव्रता झपाट्याने वाढू शकते. अल निनोच्या काळात बंगालच्या उपसागरातील काही चक्रीवादळांच्या निर्मितीचे स्थान आणि मार्ग बदलण्याची शक्यता संशोधनातून पुढे आली आहे.
भारताच्या पूर्व किनारपट्टीवर यापूर्वी चक्रीवादळांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि आर्थिक नुकसान झाले आहे. ओडिशातील १९९९ चे महाचक्रीवादळ, २०१४ मधील हुदहुद, २०१९ मधील फणी आणि २०२० मधील अम्फान या वादळांनी आपत्ती व्यवस्थापनातील त्रुटींबरोबरच पूर्वतयारीचे महत्त्वही अधोरेखित केले. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटच्या आकडेवारीनुसार २०२५ मध्ये भारतात ३६० दिवस कुठे ना कुठे तीव्र हवामानाच्या घटनांची नोंद झाली. त्यामध्ये ४,४२१ जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे १ कोटी ७४ लाख हेक्टर शेती प्रभावित झाली. जर्मनवॉचच्या हवामान जोखीम निर्देशांकानुसार १९९५ ते २०२४ या तीन दशकांत भारताला हवामानाशी संबंधित आपत्तींमुळे सुमारे १७० अब्ज अमेरिकी डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागले. आर्थिक नुकसानीपेक्षाही व्यापक प्रश्न म्हणजे आपत्तींमुळे खंडित होणारी उत्पादकता. पूर आल्याने कारखाना बंद पडतो, वाहतूक विस्कळीत होते, वीजपुरवठा खंडित होतो, कामगारांचे रोजगाराचे दिवस बुडतात आणि लहान व्यावसायिकांचे भांडवल अडकते. जागतिक तापमानवाढीमुळे महासागरांमध्ये उष्णता साठण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यातून पाण्याची वाफ धारण क्षमता वाढते. त्यामुळे चक्रीवादळांशी संबंधित अतिवृष्टीची तीव्रता वाढू शकते. विविध महासागरांत त्याचे परिणाम वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे भारतात आपत्ती व्यवस्थापनाची चौकट या बदलत्या वास्तवाशी अधिक सुसंगत करावी लागेल.
चक्रीवादळप्रवण भागांची ओळख केवळ ऐतिहासिक अनुभवावर आधारित ठेवून चालणार नाही. समुद्रपृष्ठाचे तापमान, महासागरातील उष्णतेचा साठा, वातावरणीय बदल आणि किनारपट्टीवरील लोकसंख्येची वाढ यांचा समावेश करून धोक्याचे नकाशे नियमितपणे अद्ययावत करणे आवश्यक आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांसाठी स्थानिक परिस्थितीनुसार स्वतंत्र नियोजन गरजेचे आहे. किनारपट्टीवरील खारफुटीची जंगले, नैसर्गिक वाळूच्या टेकड्या आणि पाणथळ प्रदेश हे चक्रीवादळामुळे उसळणाऱ्या समुद्राच्या लाटा, किनाऱ्याची धूप आणि पुराचा तडाखा काही प्रमाणात कमी करण्यास मदत करतात. किनारपट्टीवरील पाणथळ प्रदेश अतिरिक्त पाणी सामावून घेण्यास, प्रवाहाचा वेग कमी करण्यास आणि काही परिस्थितींमध्ये पुराचा परिणाम मर्यादित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे या नैसर्गिक संरक्षक व्यवस्थांचे संवर्धन हा किनारपट्टीवरील आपत्ती व्यवस्थापनाचा महत्त्वाचा भाग ठरतो. त्याचबरोबर मजबूत सार्वजनिक इमारती, सुरक्षित निवारा केंद्रे, विश्वासार्ह वीजपुरवठा, जलद स्थलांतर व्यवस्था आणि स्थानिक नागरिकांचे प्रशिक्षण यांवर भर द्यावा लागेल.
एखाद्या गावात चक्रीवादळाची सूचना वेळेवर पोहोचली, तरी सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी रस्ते, वाहतूक आणि निवाऱ्याची व्यवस्था नसेल, तर त्या सूचनेचा अपेक्षित उपयोग होत नाही. त्यामुळे वैज्ञानिक यंत्रणा, स्थानिक प्रशासन आणि नागरिक यांच्यात प्रभावी समन्वय आवश्यक आहे. अर्णब चक्रीवादळाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, समुद्रातील बदलत्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून विकासाचे नियोजन करता येणार नाही. महासागरांचे तापमान, वातावरणातील वाऱ्यांची दिशा आणि पर्जन्यमानातील बदल यांचा परिणाम किनारपट्टीपासून शेकडो किलोमीटर अंतरावरील प्रदेशांवरही होऊ शकतो. निसर्गाच्या या बदलत्या स्वरूपाला रोखणे मानवी क्षमतेबाहेर असले, तरी त्याचे परिणाम कमी करण्यासाठी वैज्ञानिक माहिती आणि सक्षम प्रशासनाचा उपयोग निश्चितपणे करता येऊ शकतो. भविष्यातील चक्रीवादळे नेमकी कुठे आणि किती तीव्रतेने धडकतील, याची पूर्ण खात्री देता येणार नाही. परंतु त्यांच्या संभाव्य धोक्यांचा अभ्यास करून मानवी जीवित आणि मालमत्तेचे संरक्षण व्हावे यासाठी हवामान संशोधन, पर्यावरण संवर्धन आणि आपत्ती व्यवस्थापन यांना विकासाच्या धोरणात मध्यवर्ती स्थान द्यावे लागेल. बदलत्या हवामानाचा इशारा समजून घेण्यात होणारा विलंब भविष्यात अधिक महागात पडू शकतो.