Maharashtra Drought | केंद्रीय पथकाकडून अमरावती विभागातील दुष्काळी स्थितीचा आढावा

पाच जिल्ह्यांतील पीक नुकसान, पाणीटंचाई आणि चारा उपलब्धतेची पाहणी; वाशिममध्ये शेतकऱ्यांशी साधला संवाद
Amravati Regional Drought Inspection
केंद्रीय पथकाने वाशिम जिल्ह्यातील विविध गावांना भेटी देऊन नुकसानग्रस्त शेतांची प्रत्यक्ष पाहणी केलीPudhari
Published on: 
Updated on: 

Amravati Regional Drought Inspection

वाशिम : अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा आणि शेतीपिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या आंतरमंत्रालयीन पथकाने शुक्रवारी (दि. ९) बैठक घेतली. या बैठकीत पावसाची स्थिती, पीक नुकसान, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, जनावरांसाठी चारा आणि आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई याबाबत माहिती घेण्यात आली. बैठकीनंतर केंद्रीय पथकाने वाशिम जिल्ह्यातील विविध गावांना भेटी देऊन नुकसानग्रस्त शेतांची प्रत्यक्ष पाहणी केली तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

केंद्रीय पथकात अर्जेश कुमार मधोक, महेश कुमार, सीमा रानी, संजय मीना आणि अभय भारत या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला वाशिमचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना, अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर, बुलढाण्याचे जिल्हाधिकारी प्रवीणकुमार देवरे, अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान आणि कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Amravati Regional Drought Inspection
Maharashtra Drought Crisis | ऐका पुढच्या हाका...

पाच जिल्ह्यांतील परिस्थितीचे सादरीकरण

केंद्र सरकारने राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी ११ सदस्यीय पथक नियुक्त केले आहे. या पथकात कृषी, जलसंपदा, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, अन्न व सार्वजनिक वितरण, पशुसंवर्धन, अर्थ विभाग आणि नीती आयोगासह विविध विभागांतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

बैठकीत पाचही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यांतील परिस्थितीचे सादरीकरण केले. पावसातील तूट, शेतीपिकांचे नुकसान, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, टँकरची संभाव्य गरज, शेतकरी व शेतमजुरांसमोरील अडचणी आणि मजुरांच्या स्थलांतराची शक्यता याबाबत केंद्रीय पथकाला माहिती देण्यात आली.

याशिवाय, जनावरांसाठी चाऱ्याची सद्यस्थिती आणि आगामी सात महिन्यांत निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य परिस्थितीचाही आढावा घेण्यात आला. पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे जलस्रोतांवर झालेला परिणाम, गावांमधील पाणीसाठे आणि उपलब्ध पाण्याचे स्रोत यांची माहितीही पथकाने घेतली. कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांनी प्रास्ताविक केले, तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा यांनी सूत्रसंचालन केले.

Amravati Regional Drought Inspection
Maharashtra Drought | दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

नुकसानग्रस्त शेतांची प्रत्यक्ष पाहणी

बैठकीनंतर केंद्रीय पथकाने वाशिम जिल्ह्यातील विविध गावांना भेटी देऊन पीक नुकसानीची पाहणी केली. वाशिम तालुक्यातील सुपखेला येथे दयाराम विठ्ठल राऊत यांच्या शेताची पाहणी करण्यात आली. त्यानंतर मंगरूळपीर तालुक्यातील स्वासिन येथील लघु पाटबंधारे प्रकल्पाला भेट देऊन पाणीटंचाईचा आढावा घेण्यात आला. कोठारी येथे दिलीप दुबळगुंड यांच्या शेताचीही पाहणी करण्यात आली.

दौऱ्याच्या पुढील टप्प्यात मानोरा तालुक्यातील कुपटा येथे मोहम्मद सादिक मोहम्मद शफी यांच्या, तर कारंजा तालुक्यातील काळीकारंजा येथे त्र्यंबक फकिरा गुल्हाने आणि पानविहीर येथे रमेश भाऊराव थेर यांच्या शेतांना पथकाने भेट दिली. या वेळी पिकांच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला.

Amravati Regional Drought Inspection
Maharashtra Drought: महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट; ३५ जिल्ह्यांत पावसाची तूट, १९ जिल्हे ‘रेड झोन’मध्ये

केंद्र सरकारकडे सादर होणार वस्तुनिष्ठ अहवाल

दुष्काळग्रस्त भागातील प्रत्यक्ष परिस्थिती, पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता यांचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन केंद्रीय पथकाकडून केले जाणार आहे. या पाहणीच्या आधारे दुष्काळाची तीव्रता आणि आवश्यक उपाययोजनांबाबतची माहिती केंद्र सरकारसमोर मांडली जाणार आहे. वाशिम जिल्ह्याचा दौरा पूर्ण केल्यानंतर केंद्रीय पथक यवतमाळ जिल्ह्याकडे रवाना झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news