

Aam Aadmi Party Washim Hunger Strike
वाशिम : वाशिम शहरातील विकासकामे वारंवार मुदतवाढ देऊनही पूर्ण न करणाऱ्या मे. अजयदिप इन्फ्राकॉन प्रा. लि. संभाजीनगर या ठेकेदार कंपनीवर दंडात्मक कारवाई करून तिला काळ्या यादीत टाकण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी आम आदमी पार्टी, जिल्हा वाशिम यांच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
या विकासकामांचा कार्यारंभ आदेश 4 मार्च 2021 रोजी देण्यात आला होता. या अंतर्गत वाशिम शहरात एकूण 94 विकासकामे मंजूर असून त्यापैकी आजमितीस 25 कामे अद्याप अपूर्ण असल्याचे समोर आले आहे. वारंवार मुदतवाढ देऊनही कामे पूर्ण न झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर ठेकेदार कंपनीच्या निष्काळजीपणामुळे शासकीय निधीचा अपव्यय होत असून शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. याची गंभीर दखल घ्यावी व संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीकडून करण्यात येत आहे.
या मागणीसाठी 21 जानेवारीपासून सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर येथे राम पाटील डोरले यांनी बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यान, प्रशासनाने तातडीने दखल घेऊन अपूर्ण विकासकामे पूर्ण करावीत व दोषी ठेकेदार कंपनीवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.