

जळगाव ( अमळनेर ) : अमळनेर तालुक्यातील लोंढवे शिवारात दूध वाटप करून घरी परतणाऱ्या तरुणीचा दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवार (दि.12) रोजी रात्री साडे आठ वाजता घडली. अमळनेर-धुळे रस्त्यावरील लोंढवे फाट्यानजीक ही घटना घडली असून, याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत तरुणीचे नाव भाग्यश्री दीपक पाटील (वय २२, रा. जानवे) असे आहे. भाग्यश्री ही आपल्या वडिलांच्या दुग्ध व्यवसायात मदत करत होती. वडिलांचा दीड महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातानंतर डॉक्टरांनी त्यांना दुचाकी चालवण्यास मनाई केली होती. त्यामुळे दूध पोहोचवण्याची संपूर्ण जबाबदारी भाग्यश्रीवरच होती.
१२ मे रोजी रात्री साडे आठच्या सुमारास ती दुचाकी (क्रमांक एमएच १९ ईबी ६०२७) वर दूधाचे कॅन घेऊन अमळनेरच्या दिशेने येत असताना लोंढवे शिवारात अज्ञात वाहनाने कट मारल्यामुळे तिची दुचाकी रस्त्यावर आडव्या पडलेल्या झाडावर आदळली. या अपघातात ती खाली पडून डोक्यावर गंभीर इजा झाली. ग्रामस्थांनी तिला तातडीने दवाखान्यात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. या प्रकरणी नितीन पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.