

वर्धा : ट्युशनहून परतताना दुचाकीला ट्रकने दिलेल्या धडकेत एका १५ वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. तर एक विद्यार्थी गंभीर जखमी आहे. ही दुर्घटना रामनगर येथील भगतसिंग चौक परिसरात शुक्रवारी (दि.२९) घडली. आरुष मांडवे (वय१५, रा. सावंगी, मेघे) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आरुष मांडवे आणि मिथिल मांढरे (वय १५, रा. सिंदी (मेघे) हे दोघे शिकवणी वर्ग आटोपून दुचाकीने घरी परत जात होते. दरम्यान पाठिमागून आलेल्या ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात आरुष मांडवे याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात गंभीर जखमी मिथिल मांढरे याला सावंगी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय भुसारी, पोलिस उपनिरीक्षक विजय गिरमकर, राजेश साहू, सुरज राठोड, मनीष राठोड, समीर गावंडे यांनी घटनास्थळ धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर जखमी विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी ट्रक जप्त करून चालकाला अटक केली असून त्याच्यावर रामनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने सावंगी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.