

डोणगांव: जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी-राजूर रस्त्यावरील गाढेगव्हाण गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार विहिरीत पडून भीषण अपघात झाला. हा अपघात शुक्रवारी (दि.२९) पहाटे झाला, यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून, विहिरीतून मृतदेह बाहेर काढले जात आहेत.
टेंभुर्णी-राजुर रस्त्यावर वेगाने जाणाऱ्या कारने रस्त्यावरून चालणाऱ्या दोन पादचाऱ्यांना देखील धडक दिली. या धडकेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी जालना येथे हलवण्यात आले आहे. दुसऱ्या व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे.
कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतातील विहिरीत कोसळली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. क्रेनच्या साहाय्याने कार विहिरीतून बाहेर काढण्यात आली आहे.
विहिरीतून कार बाहेर काढल्यानंतर त्यात चार व्यक्तींचे मृतदेह आढळले. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. ही कार कोणत्या दिशेने जात होती?, त्यातील व्यक्ती कोण होत्या?, याबाबत पोलीस तपास करत आहेत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.