

Selu Farmer Tiger Attack
वर्धा : सेलू तालुक्यातील रायपूर जंगली येथे वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकरी भगवान चंद्रभान धुर्वे यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत, कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी यासह विविध मागण्यांसाठी सुरू असलेले आंदोलन सहाव्या दिवशी मागे घेण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रशासनाने मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करून विविध उपाययोजनांचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. भगवान धुर्वे यांच्या पार्थिवावर बुधवारी (दि. १६) सकाळी रायपूर जंगली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती खासदार अमर काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भगवान धुर्वे यांचा ९ सप्टेंबर रोजी वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थ आणि कुटुंबीयांनी मागण्या मान्य होईपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका घेतली होती. खासदार अमर काळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. प्रशासनाकडून कुटुंबीय आणि आंदोलकांशी चर्चा करण्यात आली; मात्र मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका घेण्यात आली होती.
दरम्यान, मंगळवारी (दि. १५) जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्या अध्यक्षतेखाली कुटुंबीय, नातेवाईक, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत शासन निर्णयानुसार वनविभागामार्फत देय असलेली २५ लाख रुपयांची मदत स्वीकारण्याची विनंती करण्यात आली. तसेच आदिवासी विकास विभाग आणि वनविभागाकडून प्रत्येकी १० लाख रुपयांची विशेष बाब म्हणून मदत मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
आदिवासी विकास विभागामार्फत आकस्मिक निधीतून ५० हजार रुपयांची मदत देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. मृताच्या कुटुंबातील एका सदस्याला हंगामी वनमजूर म्हणून नियुक्त करण्याची कार्यवाही वनविभागाकडून करण्यात येणार आहे. तसेच न्युक्लिअस योजनेतून बचत गटाच्या माध्यमातून ७.५ लाख रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली. यामुळे कुटुंबाला रोजगाराचे साधन उभे करण्यास मदत होणार आहे.
वाघांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना, प्राथमिक प्रतिसाद पथकाची स्थापना, सर्व्हेलन्स कॅमेर्यांची संख्या वाढविणे आणि जनजागृती करण्याचे निर्देश वनविभागाला देण्यात आले. शेतरस्त्यांच्या दुतर्फा जाळ्या लावण्याच्या मागणीवर ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत कार्यवाही करण्याचे ठरले.
कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी ग्रामसभेचा ठराव प्राप्त झाल्यानंतर सविस्तर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबाला जागेचा पट्टा देण्याबाबत पडताळणी करून, निकष पूर्ण न झाल्यास घरकुल योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. नागपूर येथे शिक्षण घेत असलेल्या १७ वर्षीय मुलाला वसतिगृह, शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक लाभ मिळवून देण्यासाठी आदिवासी विकास विभागाने समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले.
आंदोलनस्थळी आमदार रोहित पवार यांनी भेट देऊन पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका व्यक्त केली. तसेच दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आणि शेतमजूर कुटुंबांना २५ हजार रुपये मदत देण्याची मागणी केली.
बैठकीनंतर रात्री विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार अमर काळे यांनी आंदोलन मागे घेतल्याची माहिती दिली. प्रशासनासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली. सर्वांच्या सहमतीनंतर आंदोलन समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी अतुल वांदिले, अभ्युदय मेघे, शेखर शेंडे, सुनील राऊत, रवींद्र कोटंबकर, नितेश कराळे, पीडित कुटुंबीय आणि ग्रामस्थ उपस्थित होते.