

Tractor transporting illegal sand
वर्धा : आर्वी तालुक्यातील सालफळ येथे बेकायदा रेती उपसा करून वाहतूक करणाऱ्यांविरोधात आर्वी तहसील कार्यालयाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईत एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे.
गौण खनिज वाहतूक करण्याकरिता विहित परवानगी न घेता अनधिकृतपणे गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनावर कार्यवाही करण्याकरिता तहसील कार्यालयाचे पथक कार्यरत असून सदर पथक गस्त करीत असतेवेळी मौजा सालफळ येथे अनधिकृत रेती वाहतूक करत असताना विना क्रमांकाचा ट्रॅकटर आढळून आला. महसूल पथकास पाहून चालक व इतर लोक पळून गेले.
स्थानिक चौकशी केली असता गावकऱ्यांनी ट्रॅक्टर मोरेश्वर भोंगाडे रा.मारडा यांच्या मालकीचा असल्याचे सांगितले. सदर वाहन चालकाजवळ कोणताही वाहतूक परवाना नसल्याने ट्रॅक्टर जप्त करून तहसिल कार्यालय आर्वी येथे जमा करण्यात आला आहे. ट्रॅक्टर वाहनावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई सोबत फौजदारी कारवाईसुद्धा करण्यात येणार आहे.
सदर कारवाई जिल्हाधिकारी वान्मथी सी., उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाठ, तहसीलदार हरीश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार साईकिरण आवुलवार, ग्राम महसूल अधिकारी नवज्योत जामनिक, महसूल सेवक आशिष ढानके यांच्या पथकाने केली आहे.
मागील काही दिवसापासून अवैध गौण खनिज व अवैध रेती वाहतूक करणारे महसूल विभागाच्या रडारवर असल्याने सातत्याने कारवाई केल्या जात आहे. त्यामुळे अवैध गौण खनिज व रेती वाहतुकीस आळा बसल्याचे दिसून येत आहे. आर्वी तालुक्यात बेकायदा रेती उपसा व वाहतूक करणाऱ्यांविरोधात यापुढेही अशीच कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार हरीश काळे यांनी दिली आहे.