

वर्धा : शहरात अवैधरित्या गावठी दारू विक्री वाढली असून गावाबाहेर, जंगल शिवारात या दारू व्यवसायिकांकडून गोपनीयरित्या दारूची विक्री सुरू आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी रविवारी (दि.३०) कारवाईचा धडका लावत अनेक ठिकाणांची गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले. यादरम्यान पोलिसांनी १६० गुन्ह्यांत १ कोटी ९५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जिल्ह्यात आगामी गणेश उत्सवामुळे पोलिस बंदोबस्तात व्यस्त असल्याने अवैधरित्या दारूच्या विक्रीचा व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. याबाबत पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी बैठक घेऊन दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, चार उपविभागीय पोलीस अधिकारी, १९ ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखेचे व इतर शाखेचे असे ६२६ पोलीस अंमलदार यांची १९ पोलीस ठाण्यातील वेगवेगळी पथके तयार करुन जिल्ह्यातील अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. यावेळी अवैध दारू विक्रीप्रकरणी १६५ जणांवर कारवाई करून १ कोटी ९५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.