

वर्धा: शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याची वाहतूक करणाऱ्या वाहनासह पोलिसांनी १० लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेडगाव चौकाजवळ नाकाबंदी करून ही कारवाई केली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू आणि पान मसाला नागपूरकडून वर्ध्याकडे आणला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी शेडगाव चौकात नाकाबंदी करून वाहन थांबवले आणि त्याची तपासणी केली.
या तपासणीदरम्यान, वाहनात ४ लाख रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू आणि पान मसाला आढळून आला. पोलिसांनी या मालासह वाहन जप्त केले, ज्याची एकूण किंमत १० लाख २४ हजार रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी विनायक मंगरूळकर, पवन काटोके, अरुण सदावर्ते (सर्व रा. मांडगाव) आणि यादव वानवडे (रा. गिरड) या चार जणांना ताब्यात घेतले.
समुद्रपूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक प्रकाश लसुंते, मनोज धात्रक, शेखर डोंगरे, महादेव सानप, पवन पन्नासे, विकास मुंडे, गोविंद मुंडे, सुगम चौधरी, विनोद कापसे, शुभम राऊत, पी. व्ही. मानवतकर आणि अन्न सुरक्षा अधिकारी यांचा सहभाग होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.