

वर्धा : जून ते सप्टेंबर या महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाने पुढाकार घेत 31 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेज अंतर्गत जिल्ह्यातील शेतक-यांना रब्बी पिकांची लागवड करण्यासाठी बियाणे व तत्सम खरीदीसाठी प्रती हेक्टरी 10 हजार रूपयांची मदत तीन हेक्टरपर्यंत करण्याबाबात 282 कोटी 18 लाख रूपयांचा प्रस्ताव पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकरातून राज्य शासनाला सादर करण्यात आला. लवकरच ही मदत शेतकऱ्यांना देण्यात येईल, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी, पूरामुळे शेत पिकांचे तसेच शेतक-यांच्या साधन सामुग्रीचे प्रचंड नुकसान झाले होते. राज्यात विदारक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजीत पवार यांनी शेतकऱ्यांना मदतीचा आधार देण्यासाठी राज्याच्या इतिहासातील सर्वांत मोठे पॅकेज जाहीर करीत शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 31 हजार कोटी रूपयांची तरतूद केली. सदर तरतूदी अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासोबतच रब्बीसाठी बियाणे खरेदीसाठी देखील मदत करण्यात येत आहे. आर्थिक मदत शेतक-यांच्या खात्यात जमा करण्यात आली असून काही शेतक-यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.
1299 गावांतील शेतक-यांना मिळणार मदत
जून ते सप्टेंबर या कालावधीत 33 टक्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतक-यांना रब्बी हंगामामध्ये बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता प्रती हेक्टर 10 हजार प्रमाणे अतिरिक्त निधी देण्यात येणार आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत वर्धा तालुक्यातील 155 गावातील 28 हजार 42 शेतक-यांचे 40 हजार 480 हे. मधील नुकसान झाले होते. सेलु तालुक्यातील 169 गावातील 26 हजार 480 शेतक-यांचे 29 हजार 479 हे. मधील, देवळी तालुक्यातील 150 गावातील 29 हजार 81 शेतक-यांचे 40 हजार 215 हे.चे, आर्वी तालुक्यातील 147 गावातील 27 हजार 178 शेतक-यांचे 33 हजार 280 हेक्ट., आष्टी तालुक्यातील 154 गावातील 18 हजार 844 शेतक-यांचे 14 हजार 594 हेक्टर. क्षेत्राचे, कारंजा तालुक्यातील 120 गावातील 27 हजार 21 शेतक-यांचे 26 हजार 383 हेक्टर क्षेत्राचे, हिंगणघाट तालुक्यातील 187 गावातील 41 हजार 99 शेतक-यांचे 47 हजार 519 हेक्टर क्षेत्राचे व समुद्रपूर तालुक्यातील 217 गावातील 36 हजार 816 शेतक-यांचे 50 हजार 357 हेक्टर क्षेत्रातील शेत पिकांचे नुकसान झाले होते. या शेतक-यांना रब्बी हंगामासाठी मदत मिळावी यासाठी पालकमंत्री डॉ. भोयर यांनी पुढाकार घेऊन जिल्हा प्रशासनाला राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने 282कोटी 18 लक्ष रुपयांचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्यातील वंचित राहलेल्या वीस मंडळाचा देखील नुकसानग्रस्त पॅकेज मध्ये समावेश करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन कटिबद्ध
बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे. या वर्षी अस्मानी संकटामुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या संकटातून शेतक-यांना बाहेर काढण्यासाठी राज्य शासन सर्वातोपरी मदत करीत आहे. याच मदतीचा भाग म्हणून खरीप हातचे गेल्याने रब्बीमुळे त्याला आधार मिळावा, यासाठी राज्य सरकार शेतक-यांना रब्बीचे बियाणे व अन्य बाबींसाठी प्रती हेक्टर 3 हेक्टर पर्यंत मदत करणार आहे. ही मदत शेतक-यांना लवकरात लवकर देण्यासाठी प्रयत्न करणार.