

वर्धा : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आगामी काळात होऊ घातल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या ५२ गट आणि पंचायत समितीच्या १०४ गणांची आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. यावेळी अनेक इच्छुकांना आनंद झाला तर काहींचा मात्र हिरमोड झाला. एकूणच कही खुशी कही गमचे चित्र निर्माण झाले.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीकरीता जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पदासाठी जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणूक प्रभारी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे तसेच राजकिय पक्षाचे प्रतिनिधी, पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य व नागरिक उपस्थित होते.
सोडत जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी मागील सदस्यांना धक्का बसला. अनेक ठिकाणी इच्छुकांनी सोडत जाहीर होताच आनंद व्यक्त केला. अनेक ठिकाणी समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. जिल्हा परिषदेमध्ये एकूण ५२ जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले असून त्यापैकी २६ जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. आरक्षणाच्या या प्रक्रियेमुळे अनेक दावेदारांचे समीकरण बदलले असून, काहींचे स्वप्ने भंगली, तर काहींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.
सर्वसाधारण प्रवर्ग पोहणा, सालोड (हिरापूर), मांडगाव, तऱोडा, पिपरी (मेघे), तळेगाव (टालाटूले), महाबळा, जळगाव, लहान आर्वी, केळझर, गिरड, वडनेर, ठाणेगाव तर सर्वसाधारण महिला असे आरक्षण पारडी, अल्लीपूर, तळेगाव (श्या. पंत.), वाठोडा, शेकापूर (बाई), कानगाव, जाम, अंदोरी, कन्नमवारग्राम, वाघोली, सावली (वाघ) या गटाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग असे येळाकेळी, आंजी (मोठी), कांढळी, सेवाग्राम, हमदापूर, वायगाव (नि.), वायफड तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे भिडी, घोरोड, पवनार, वरुड, बोरगाव (मेघे), नंदोरी, इंझाळा या गटाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. अनुसूचित जाती गौळ, गुंजखेडा, नाळवाडी तर अनुसूचित जाती महिला असे वाठोडा, नाचणगाव, सिंदी (मेघे), सावंगी (मेघे) या गटाचे आरक्षण जाहीर झाले. अनुसूचित जमातीकरिता कोरा, झडशी, विरुळ तर अनुसूचित जमाती महिला असे मोरांगणा, साहूर, रोहणा, सिंदी (विहिरी) या गटाचे आरक्षण सोडती अंती जाहीर झाले.
आरक्षणावर हरकती व सूचना असल्यास 17 ऑक्टोंबर पर्यंत सादर करता येणार
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूका 2025 करीता आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. प्रारुप आरक्षणावर नागरिकांना हरकती व सूचना असल्यास 17 ऑक्टोंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय किंवा संबंधित तहसिल कार्यालयात सादर करता येणार आहे.
जिल्हा परिषद सदस्य पदासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच पंचायत समिती सदस्य पदासाठी संबंधित तालुक्याच्या तहसिल कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली असून आरक्षणाबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालय व संबंधित तहसिल कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात आली आहे. या अधिसूचनेवर नागरिकांना हरकती व सूचना दाखल करावयाच्या असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय व संबंधित तहसिल कार्यालयात 17 ऑक्टोंबरपर्यंत सादर कराव्या, असे जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणूक प्रभारी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांनी कळविले आहे.