Wardha News | जिल्ह्यात 15 हजारांवर शेतकऱ्यांना 12 कोटी 14 लाखांची सोयाबीन नुकसानभरपाई मंजूर

62 हजार 664 शेतकऱ्यांनी केली होती पीक विमा नोंदणी
Wardha News
प्रातिनिधिक छायाचित्र. File Photo.
Published on
Updated on

Wardha crop insurance

वर्धा : पुढारी वृत्तसेवा

पीक विमा योजनेंतर्गत गेल्या खरीप हंगामात कापूस, तूर, सोयाबीन व इतर पिकांसाठी जिल्ह्यातील 62 हजार 664 शेतकऱ्यांनी पीक विमा नोंदणी केली होती. या शेतकऱ्यांपैकी सोयाबीन पिकाचे नुकसान झालेल्या 15 हजार 305 शेतकऱ्यांना 12 कोटी 14 लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे.

... तर त्या क्षेत्रातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे गृहीत

पीक विमा योजनेंतर्गत खरीप व रब्बी हंगामाकरिता पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या इतर बाबींमुळे हंगामाच्या शेवटी, पीक कापणी प्रयोगाच्या आधारे तांत्रिक उत्पादन आधारे, सदर महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरून नुकसानभरपाई देण्यात येते. एखाद्या निर्धारित क्षेत्रातील विमा संरक्षित पिकाचे त्यावर्षीचे दर हेक्टरी सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आले तर त्या क्षेत्रातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले, असे गृहीत धरण्यात येते.

Wardha News
Crop insurance: पीक विमाधारक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

55 पैकी 37 महसूल मंडळात सोयाबीन पिकाचे नुकसान

जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस पिकाकरिता 29 हजार 782, तूर पिकाकरिता 8 हजार 533, सोयाबीन पिकाकरिता 24 हजार 182 व इतर पिकांकरिता 167 असे एकूण 62 हजार 664 शेतकऱ्यांनी विमा नोंदणी केली होती. जिल्ह्यात एकूण 55 महसूल मंडळांपैकी 37 महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते. अशा नुकसानग्रस्त 15 हजार 305 शेतकऱ्यांना 12 कोटी 14 लाखांचा पीक विमा मंजूर करण्यात आला. यामध्ये आर्वी तालुक्यातील 6 महसूल मंडळातील 1437 शेतकरी, आष्टी तालुक्यातील 1 महसूल मंडळ 310 शेतकरी, देवळी तालुका 5 महसूल मंडळ 3585 शेतकरी, हिंगणघाट तालुका 7 महसूल मंडळ 2908 शेतकरी, समुद्रपूर तालुका 7 महसूल मंडळ 3129 शेतकरी, सेलू तालुका 5 महसूल मंडळ 2041 शेतकरी, वर्धा तालुक्यातील 6 महसूल मंडळातील 1894 शेतकऱ्यांचा समावेश आहे.

Wardha News
Crop loan increase | पीक कर्ज मर्यादेत 10 ते 25 टक्क्यांनी वाढ

5 महसूल मंडळात सोयाबीनकरिता पीक विमा लागू नाही

कारंजा व आष्टी तालुक्यातील प्रत्येकी 2, वर्धा तालुक्यातील 1 अशा 5 महसूल मंडळात सोयाबीन पिकाकरिता पीक विमा लागू झालेला नाही. उर्वरित 13 महसूल मंडळांची नुकसानभरपाई परिगणना सुरू आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा नुकसानभरपाई संबंधित अडचण असल्यास अधिक माहितीसाठी क्षेत्रीय स्तरावरील भारतीय कृषी विमा कंपनीच्या कार्यालयाकडे प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

Wardha News
Crop Insurance | खरीप पीकविमा भरपाई तुटपुंजी देण्याचा विमा कंपनीचा घाट; स्वाभिमानी संघटना लढा उभारणार

विमा संरक्षित रक्कम व विमा नोंदणी

गेल्या खरीप व रब्बी हंगामात विमा संरक्षित रक्कम कापूस 60 हजार, सोयाबीन 57 हजार 500, तूर 44 हजार, उडीद व मूग 23 हजार, ज्वारी 30 हजार, गहू 44 हजार, हरभरा 36 हजार रुपये प्रति हेक्टरी संरक्षित रक्कम होती. कापूस पिकाकरिता 29 हजार 782, तूर पिक 8 हजार 533, सोयाबीन पिक 24 हजार 182 व इतर पिकांकरिता 167 अशा 62 हजार 664 शेतकऱ्यांची विमा नोंदणी झालेली होती. तसेच रब्बी हंगामात हरभरा पिकाकरिता 5 हजार 510 तर गहू पिकाकरिता 2 हजार 611 शेतकऱ्यांनी विमा नोंदणी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news