

वर्धा : वर्ध्याहून नागपूरकडे जाणाऱ्या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगातील कार रस्त्याच्या दुभाजकावर आदळून दुसऱ्या बाजूने येणाऱ्या ट्रकला धडकली. या भीषण अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी आहे. हा भीषण अपघात बुधवारी (ता. २०) सायंकाळच्या सुमारास सेलू-नागपूर महामार्गावरील खडकी नजीक घडला.
वैशाली जयंत जुनघरे (वय ४९), मुलगी आस्था जयंत जुनघरे (वय १९), मुलगा सोनू जयंत जुनघरे (वय २४) अशी मृतांची नावे असून जयंत वासुदेव जुनघरे (वय ५५) हे या अपघातात गंभीर जखमी झाले. हे चौघेही एकाच कुटुंबातील सदस्य आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, वर्ध्याच्या पंजाब कॉलनी येथील रहिवासी जुनघरे कुटुंबातील सदस्य नातलगाकडे कारने नागपूरला जात होते. दरम्यान खडकी शिवारात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या दुसऱ्या कडेला गेली. अनियंत्रित कार दुसऱ्या बाजूने ट्रकला धडकून रस्त्याच्या कडेला उतरली. या अपघातात एकाच कुटुंबातील वैशाली जुनघरे, मुलगी आस्था, मुलगा सोनू या तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघातात गंभीर जखमी झालेले जयंत जुनघरे यांना आपल्या रुग्णवाहिकेतून सेवाग्राम रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक ज्ञानोबा पडनाके, पोलिस हवालदार प्रफुल डफ, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय भगत, अमोल कोडापे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. याप्रकरणी सिंदी (रेल्वे) पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. अपघातामुळे घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.