

Agriculture Loan Waiver
वर्धा : शेतकर्यांना दरवर्षी दिल्या जाणार्या पीककर्जाची विहित मुदतीत परतफेड करणे आवश्यक आहे. परतफेड न झाल्यास शेतकर्यांना पुढील वर्षी कर्ज उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होण्यासोबतच कर्जावरील व्याज सवलत योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे शेतकर्यांनी पीक कर्ज वेळेवर नुतनीकरण करावे व वाढीव पीक कर्जासह व्याज सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी केले आहे.
जिल्ह्यातील विविध बँकांमार्फत दरवर्षी पीककर्जाचे वितरण केले जाते. या अल्पमुदत पीककर्जाची परतफेड विहित मुदतीत म्हणजे कर्ज घेतल्यापासून ३६५ दिवस किंवा ३० जून पूर्वी करावी लागते. या मुदतीत कर्जफेड करणार्या शेतकर्यांना नवीन वर्षासाठी पुन्हा कर्ज दिले जाते. मुदतीत परतफेड न केल्यास कर्ज खाते थकीत होते. अशा थकीत खातेधारकांना बँका पीककर्ज देत नाही. त्यामुळे शेतकर्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. खाते नुतनीकरण करुन घेतल्यास नवीन पीककर्जाच्या दरानुसार वाढीव कर्ज घेण्यास शेतकरी पात्र होतात.
विहित मुदतीत कर्ज परतफेड केल्यास डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ उपलब्ध होतो. या योजनेंतर्गत ३ लाखांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदरावर शेतकर्यांना उपलब्ध होते. कर्जखाते नुतनीकरण केलेल्या शेतकर्यांना बँकांच्या इतर कर्ज योजनांचा देखील लाभ घेता येतो. त्यात कृषी वाहन योजना, शेती तारण योजना, फळबाग, फुलबाग, हरितगृह, शेडनेट योजना, शेळीपालन, पशुपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, कृषि यांत्रिकीकरण, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया आदी योजनेचा लाभ शेतकर्यांना घेता येतो.
सन २०१७-१८ मध्ये पीक कर्ज नुतनीकरण झालेल्या खात्यांची संख्या १३ हजार ४९२ होती. सन २०१८-१९ मध्य ९ हजार १४७, सन २०१९-२० मध्ये १४ हजार ७७२, सन २०२०-२१ मध्ये १३ हजार ३७५, सन २०२१-२२ मध्ये ३८ हजार २९९, सन २०२२-२३ मध्ये ४३ हजार ७६, सन २०२३-२४ मध्ये ५० हजार ८४१ व सन २०२४-२५ मध्ये २९ हजार ७६७ शेतकर्यांनी पीक कर्ज खाते नुतनीकरण केले आहे.