

वर्धा : आर्वी तालुक्यातील कासारखेडा येथे वादळी पावसादरम्यान वीज पडून एका शेतकर्याचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि.२७) दुपारी ४.३० च्या सुमारास घडली. रमेश गुणवंत अड्डे (वय ४५), रा. कासारखेडा असे मृत शेतकर्याचे नाव आहे. वासुदेव महादेव अड्डे (वय ६५) रा. कासारखेडा हे या घटनेत गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी कासारखेडा येथील शेतकरी रमेश अड्डे व वासुदेव अड्डे त्यांच्या कासारखेडा शिवारातील शेतात काम करण्यासाठी गेले होते. दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन पाऊस सुरू झाला. यादरम्यान शेतात अडोशाला थांबलेल्या दोघांवर वीज पडल्याने रमेश अड्डे यांचा जागीच मृत्यू झाला तर वासुदेव अड्डे हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मोठी गर्दी केली. त्यानंतर पोलिसांनी माहिती देण्यात आली. त्यानंतर जखमीला वासुदेव अड्डे यांना तातडीने सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.