

मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी तिला पुण्यात एमबीएला प्रवेश मिळाल्याचा आनंद साजरा करून परतणाऱ्या टिपले कुटुंबासाठी हा प्रवास अखेरचा ठरला.
Samruddhi Mahamarg Truck Car Accident Wardha
पंकज गादगे, वर्धा
उच्च शिक्षणासाठी मुलीला पुण्यात एमबीएला प्रवेश मिळाला... कुटुंबाने आनंदाने तिला महाविद्यालयात सोडले... आणि परतीच्या प्रवासात नियतीने असा घाव घातला की संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले. वर्धा तालुक्यातील सालोड येथील टिपले कुटुंबावर समृद्धी महामार्गावर काळाने झडप घातली. पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वीरूळ इंटरचेंजजवळ कारला भरधाव आयशर ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने कारमधील चार आणि ट्रकमधील दोन अशा एकूण सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश टिपले यांच्या दोन जुळ्या मुली आहेत. त्यापैकी एका मुलीला पुण्यातील एमबीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाल्याने कुटुंबातील सदस्य तिला सोडण्यासाठी पुण्याला गेले होते. प्रवेशाची औपचारिकता पूर्ण करून मुलीचा निरोप घेत कुटुंब वर्ध्याकडे परत निघाले होते. मात्र, समृद्धी महामार्गावर वीरूळ इंटरचेंजजवळ त्यांच्यावर काळाने घाला घातला. एका क्षणात आनंदाचे वातावरण दुःखात बदलले.
समृद्धी महामार्गावर यापूर्वी नागपूरकडे जाणाऱ्या मार्गावर इथेनॉलचा ट्रक पलटी झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे वाहने दुसऱ्या लेनवर टप्प्याटप्प्याने सोडली जात होती. याचदरम्यान मागून भरधाव वेगाने आलेल्या मिरची वाहून नेणाऱ्या आयशर ट्रकने कारला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की कार ट्रकखाली चिरडली गेली, तर ट्रकला आग लागली. या आगीत ट्रक चालक आणि क्लीनर यांचा होरपळून मृत्यू झाला, तर कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात चालक अंकुश राऊत, राजेश टिपले, जान्हवी टिपले आणि सुषमा टिपले, सर्व रा. सालोड, ता. वर्धा यांचा मृत्यू झाला. तसेच आयशर ट्रक चालक संजय कुमार, रा. धनाजीपूर, उत्तर प्रदेश आणि क्लीनर समरजित पाल, रा. गडहरियनपूर, उत्तर प्रदेश यांचाही मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस अधिकारी सरिता यादव, पुलगावचे पोलीस निरीक्षक सदाशिव ढाकणे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आणि मृतदेह रुग्णालयात हलवले.
दोन मृतदेह पुलगाव तर चार मृतदेह वर्धा जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मात्र, अपघातानंतर समृद्धी महामार्गावरील वाहतूक दीर्घकाळ विस्कळीत राहिली.
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी तिला पुण्यात एमबीएला प्रवेश मिळाल्याचा आनंद साजरा करून परतणाऱ्या टिपले कुटुंबासाठी हा प्रवास अखेरचा ठरला. एका क्षणात चार जणांचा जीव गेला आणि एका मुलीच्या आयुष्यात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली. समृद्धी महामार्गावरील हा भीषण अपघात पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणणारा ठरला.