

Smuggled Goods
वर्धा : दोन वेगवेगळ्या कार्यवाहीमध्ये प्रतिबंधीत केलेल्या सुगंधीत तंबाखू, पान मसाला साठा, वाहनासह ५ लाख ६७ हजार ९६५ रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त करत होते. पथकाने गोपनिय माहितीच्या आधारे शुभम अरूणराव वैद्य मांडगाव याच्यावर मांडगाव ते शेडगाव चौरस्ता रोडवर सापळा रचुन छापा टाकला. पोलिसांनी प्रतिबंधीत तंबाखू साठा वाहनासह ५ लाख ५२ हजार ९६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दुसर्या कार्यवाहीमध्ये पुरूषोत्तम वसंतराव भुते रा. वाघोली, ता. हिंगणघाट याच्याकडे छापा टाकला. त्याच्याकडून प्रतिबंधीत सुंगधीत तंबाखू साठा जप्त केला. दोन वेगवेगळ्या कार्यवाहीमध्ये ५५ किलो २०५ ग्रॅम वजनाचा प्रतिबंधीत तंबाखू व पान मसालाचा साठा वाहनासह ५ लाख ६७ हजार ९६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी हिंगणघाट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, रितेश गेटमे, अभिषेक नाईक यांनी केली.