

वर्धा: पोटाला हात लावून सतत रडत असलेल्या केवळ सहा महिने वयाच्या आणि आठ किलो वजनाच्या बाळावर सावंगी येथील शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी सेंटरमधील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागातील तज्ज्ञ चमूने तातडीने एंडोस्कोपी करीत पोटातील वस्तू बाहेर काढण्यात यश मिळविले. आकस्मिक परिस्थितीत बाळावर करण्यात आलेल्या या उपचारांनी त्याला जीवनदान मिळाले आहे.
स्थानिक रहिवासी असलेले एक विवाहित जोडपे आपल्या अशांत बाळाला सावंगी मेघे रुग्णालयात घेऊन आले. प्राथमिक तपासणीत बाळाच्या छातीत व पोटात अस्वस्थता जाणवत होती. त्यानुसार पोट आणि छातीचा एक्स-रे केला असता या तपासणीत कोणतीही असामान्य बाब आढळून आली नाही. मात्र, शरीरात 'फॉरेन बॉडी' असल्याची शंका अनुभवी डॉक्टरांना आल्याने त्याअनुषंगाने तपासणी करण्यासाठी बाळाला रुग्णालयातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागात नेण्यात आले. या विभागात गॅस्ट्रोस्कोपिक तपासणीदरम्यान डॉक्टरांना बाळाच्या पोटाच्या आंतरभागात अडकलेली बाह्य वस्तू दिसून आली.
या प्रक्रियेपूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून बाळाला इंट्युबेट करून यांत्रिक व्हेंटिलेशनवर ठेवण्यात आले. एंडोस्कोपच्या बायोप्सी चॅनेलद्वारे घातलेल्या विशेष रोथ-नेट रिट्रीव्हल डिव्हाइसचा वापर करून वैद्यकीय चमूने ही बाह्यवस्तू काळजीपूर्वक शोधून काढली. या प्रक्रियेत वैद्यकीय कौशल्य आणि समयसूचकता दाखवत डॉक्टरांनी एंडोस्कोपीद्वारे बाळाच्या पोटातून प्लास्टिकच्या खेळण्याची चावी सुरक्षित पद्धतीने बाहेर काढत, बाळाला कोणताही अपाय होणार नाही याची काळजी घेतली.
बाळाकडून नकळत ही प्लास्टिक चावी गिळल्या गेली होती. योग्य निदान, नवतंत्रज्ञान आणि डॉक्टरांच्या अत्याधुनिक उपचार प्रणालीने जीवावर बेतणाऱ्या या प्रसंगातून बाळाला मुक्त केले. या प्रक्रियेत गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभाग प्रमुख डॉ. विजेंद्र किरनाके, डॉ. अक्षय कोडमलवार, डॉ. आयुष सोमाणी, अॅनेस्थेशिया विभाग प्रमुख डॉ. विवेक चकोले, तंत्रज्ञ अंकुश स्वामी, डॉ. उदय रेड्डी, डॉ. वरूण दहिया यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. बाळाला दिवसभर वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवत दुसऱ्या दिवशी प्रकृती स्थिर झाल्यावर सुट्टी देण्यात आली.
नवजात शिशू आणि लहान मुलांमध्ये अन्नाव्यतिरिक्त इतर वस्तूंचे सेवन ही एक नैसर्गिक मात्र आपत्कालीन परिस्थिती निर्माण करणारी प्रवृत्ती आहे. अनेकदा नाणी, बटन, लहान सेल, चमकणाऱ्या वस्तू, नखे, पडलेले दात, मांसाहारातील हाडांचे तुकडे लहान मुले गिळतात. अशा स्थितीत गंभीर गुंतागुंत निर्माण होण्यापूर्वीच तातडीने वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे ठरते, असे मत डॉ. विजेंद्र किरनाके यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागात असूनही सावंगी रुग्णालयातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाने गेल्या ११ वर्षात १५ हजाराहून अधिक निदानात्मक एंडोस्कोपी आणि अडीच हजाराहून अधिक उपचारात्मक एंडोस्कोपी केल्या आहेत, अशी माहिती डॉ. किरनाके यांनी यावेळी दिली.