

Forest Department Wardha
वर्धा : वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील दसोडा येथील जंगल परिसरात वनरक्षकांना गस्त करीत असताना वाघाचा एक ते सव्वा महिन्याचा बछडा मृत अवस्थेत आढळला. बछड्याचा नैसर्गिक मृत्यू असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रपुर तालुक्यातील मंगरूळ सहवनक्षेत्र अंतर्गत दसोडा शिवारात वनरक्षक गस्त करीत होते. त्यावेळी वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. ही माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गांवडे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. उपवनसंरक्षक हरविरसिंग, सहाय्यक वनसंरक्षक हरीलाल सरोदे, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण प्रतिनिधी ए.बी. गिरी, मानद वन्यजिव रक्षक संजय इंगळे (तिगावकर), पिपल फॉर अॅनिमल्स प्रतिनिधी रूषीकेश गोदसे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली.
घटनास्थळी पंचनामा नोंद करण्यात आला. वाघाचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला. तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अरुण तुराळे, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.डी. के. बारापात्रे, डॉ. ज्योती चव्हाण यांनी वनअधिकार्यांच्या उपस्थितीत बछड्याचे शवविच्छेदन केले. मृत वाघ बछडा मादी असून अंदाजे वय एक ते सव्वा महिना आणि नैसर्गिक मृत्यू असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला.
शवविच्छेदन कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर अग्नी देण्यात आला. ही कारवाई एनटीसीएच्या मार्गदर्शक तत्वानुसार पूर्ण करण्यात आली. ही कार्यवाही उपवनसंरक्षक हरविरसिंग, सहाय्यक वनसंरक्षक हरीलाल सरोदे, वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.