

वर्धा : घरफोडी प्रकरणातील आरोपींकडून ६४ ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख व वाहनासह १० लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. तपासादरम्यान वर्धा, वरोरा, बुटीबोरी येथील ६ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले.
सावंगी (मेघे) येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घरच्या आत प्रवेश करून ६९ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी तक्रारीवरून सावंगी (मेघे) पोलिसांनी गुन्हा दाखल केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विशाल राम गायकवाड रा. नागपूर तसेच त्याच्या साथीदाराला दोन वाहनासह ताब्यात घेतले. विशाल उर्फ बबलू राम गायकवाड, आदित्य राम गायकवाड दोन्ही राहणार कैकाडी नगर, नागपूर तसेच दोन विधी संघर्षित बालक यांना गुन्ह्याबाबत विचारपूस करण्यात आली. त्यावेळी घरफोडीच्या गुन्ह्यांची माहिती पुढे आली.
चौकशीदरम्यान पोलीस स्टेशन देवळी, वर्धा शहर, सेवाग्राम, वरोरा, बुटीबोरी येथील घरफोडीचे ६ गुन्हे उघडकीस आले. आरोपींना न्यायालयाकडून तीन दिवस पोलीस कोठडी मिळाल्यावरून तपासामध्ये ६ गुन्ह्यात चोरीस गेलेले ६४ ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख रक्कम वाहन असा १० लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आणखी घरफोडीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, सहायक पोलिस निरीक्षक पंकज वाघोडे, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश लसुंते, पोलीस अंमलदार शेखर डोंगरे, मनोज धात्रक, संजय पंचभाई, हमीद शेख, महादेव सानप, विकास मुंढे, सुगम चौधरी, विनोद कापसे, शुभम राउत, मंगेश आदे, निखिल फुटाणे, अंजली गाडेकर, सायबर सेलचे पोलीस अंमलदार दिनेश बोथकर, अनुप कावळे, अंकित जिभे, स्मिता महाजन यांनी केली.