

वर्धा : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. विधानसभेकरिता काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. त्यामध्ये अर्ज दाखल केलेल्या इच्छुक उमेदवारांची गुरुवारी 10 ऑक्टोबर रोजी मुलाखत होणार आहे. जिल्हा काँग्रेस मुख्यालय इंदिरा सदभावना भवन बॅचलर रोड वर्धा येथे जिल्हा निरीक्षकांच्या उपस्थितीत या मुलाखती होणार आहे.
वर्धा जिल्ह्यात वर्धा, आर्वी, हिंगणघाट आणि देवळी असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. सध्या काँग्रेसकडे एकमेव देवळी विधानसभा मतदारसंघ असून आर्वी, हिंगणघाट आणि वर्धा विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. विधानसभा करता निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांचे काँग्रेसकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यामध्ये चारही विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. गुरुवारी 10 ऑक्टोबर रोजी इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे. या मुलाखतीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती वर्धा जिल्हा निरीक्षक आमदार नितीन राऊत यांच्याद्वारे जिल्हा काँग्रेस मुख्यालय इंदिरा सदभावना भवन बॅचलर रोड वर्धा येथे होणार आहे. सकाळी ११ देवळी, सकाळी ११.१५ आर्वी, दुपारी १२ हिंगणघाट, दुपारी २ वाजता वर्धा असे वेळापत्रक ठेवण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरीता येताना निवडक पाच समर्थकांना घेऊन यावे. ज्या उमेदवारांनी परस्पर मुंबई कार्यालयात अर्ज दाखल केले असतील त्यांनी पावती सोबत आणावी, असे आवाहन जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मनोज चांदुरकर यांनी केले आहे.