

वर्धा : वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यातील 600 शिक्षकांना येत्या दोन-तीन दिवसात प्रशिक्षण पूर्ण केल्याबाबतचे प्रमाणपत्र वितरित करण्यात येईल. असे आश्वासन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे यांनी प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने नागपूर विभाग प्रमुख अजय भोयर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाला दिले.
शिक्षकांना सेवेची बारा वर्षे पूर्ण केल्यानंतर वरिष्ठ वेतन श्रेणी व सेवेची 24 वर्ष पूर्ण केल्यानंतर अटींची पूर्तता केल्यानंतर निवड वेतनश्रेणीचा लाभ मिळतो. त्याकरीता प्रशिक्षण पूर्ण करून तसे प्रमाणपत्र जोडल्याशिवाय सदर लाभ मिळत नाही. सदर प्रशिक्षण 2 जून ते 12 जून या कालावधीत घेण्यात आले होते. प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांनी स्वाध्याय कृती संशोधन सह अन्य बाबींची पूर्तता केल्यानंतरही प्रमाणपत्र वितरित न केल्याने शिक्षकांना तसा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे मान्यतेकरीता पाठविता आला नाही, त्यामुळे शिक्षक वरिष्ठ व निवड श्रेणीच्या लाभापासून वंचित होते. दोन-तीन दिवसात प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र वितरित केल्यानंतर पुढील कार्यवाही होऊन शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे व कृती समितीचे मनीष मारोडकर, मोहम्मद ईजारूद्दीन, राजीव धात्रक, अमित प्रसाद, दिलीप मारोटकर उपस्थित होते.