

वर्धा : राज्य शासनाने सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सोयाबीनचा हमीभाव 5 हजार 328 रुपये आहे. जिल्ह्यातील 6 खरेदी विक्री केंद्रावर व 7 कृषि उत्पन्न बाजार समिती मार्फत 15 नोव्हेंबरपासुन सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे. यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु असून शेतकऱ्यांनी संबंधित खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदीसाठी आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचा सातबारा उतारा, आधारकार्ड व बँक पासबुकच्या प्रतीसह नोंदणी करीता तालुक्याच्या खरेदी विक्री किंवा कृषि उत्पन्न बाजार समितीशी संपर्क साधावा. तसेच भारतीय कपास निगम मार्फत हमी भावाने मोठा धागा असलेला कापूस 8 हजार 100 रुपये व लहान धागा असलेला कापूस 7 हजार 850 रुपये दराने खरेदी करण्यात येत आहे. यासाठी वर्धा तालुक्यामध्ये वायगाव, सेलू, देवळी तालुक्यात देवळी, पुलगाव, हिंगणघाट तालुक्यात हिंगणघाट, वडनेर, समुद्रपूर, आर्वी तालुक्यात आर्वी, रोहणा, खरांगणा तसेच कारंजा येथील विविध 13 केंद्र व 59 जिनिंगमध्ये कापूस खरेदी करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांनी कपास किसान या ॲपवर नोंदणी करावी किंवा यासंबंधित कृषि उत्पन्न बाजार समितीशी संपर्क साधून नोंदणी करुन घ्यावी, असे सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधकांनी कळविले आहे.