

वर्धा जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये सोयाबीनच्या पिकावर रोग आणि कीड प्रादुर्भावाचे मोठे संकट आले आहे. येलो मोझॅक, चारकोल रॉट तसेच हुमणी अळी यांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतात उभे असलेले सोयाबीनचे पीक पिवळे पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा मावळत असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
हिंगणघाट, आर्वी, देवळी, समुद्रपूर, तसेच जिल्ह्यातील इतर भागात शेतातील सोयाबीन पीक रोगाच्या झटक्याने पिवळे पडले आहे. काही ठिकाणी चारकोल रॉटमुळे संपूर्ण झाडे सुकून कोमेजली आहेत. तर हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर जनावरे सोडल्याचे चित्रही दिसून येत आहे.
हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांनी मांडगाव शिवारात जाऊन सोयाबीन पिकांची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानीबाबत मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन तातडीने नुकसान भरपाई जाहीर करण्याची मागणी करणार असल्याचे आमदार समीर कुणावार यांनी सांगितले.
सध्या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन व मदतीची गरज आहे. रोगनियंत्रण, कीडनियंत्रणासाठी तांत्रिक उपाययोजना, तसेच तातडीने आर्थिक सहाय्य मिळाल्यास शेतकऱ्यांचा दिलासा होऊ शकेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.