वर्धा; पुढारी वृत्तसेवा: बिबट्याच्या दोन बछड्यांचे आईसोबत पुनर्मिलन करण्यात वर्धा वनविभाग आणि पीपल फॉर अॅनिमल्स वन्यजीव बचाव केद्रांच्या प्रयत्नांना यश आले. सेलू तालुक्यातील शेतात सोयाबीन सवंगणी सुरू होती. अचानक त्या ठिकाणी बिबट्याचे २५ दिवसांचे दोन बछडे आढळून आले. गावकर्यांनी लगेच या घटनेची माहिती वनविभागाला दिली.
या घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी हिंगणीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय आगाशे, वनरक्षक अस्लम मौजाण, वनमजूर संजय परासे व पीपल फॉर एनिमल्स वन्यजीव बचाव केंद्राचे कौस्तुभ गावंडे, डॉ. रोहित थोटा इतर वन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी दोन बछडे दिसून आले असता त्यांनी लगेच त्या बछड्यांना ताब्यात घेत त्याला पुढील तपासणी करीता पीपल फॉर एनिमल वन्यजीव बचाव केंद्र येथे नेण्यात आले. त्याठिकाणी त्यांची पाहणी तेथील संचालक आशिष गोस्वामी, वन्यजीव विभाग प्रमुख कौस्तुभ गावंडे यांनी केली व डॉ. रोहित थोटा यांनी प्राथमिक तपासणी केली असता दोन्ही बछडे सुदृढ असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर सदर बछड्यांना त्याच्या आई सोबत पुनर्मिलन होण्याकरिता त्याच ठिकाणी जाऊन शास्त्रोक्त पद्धतीने प्रयत्न सुरू करण्यात आले व ठीक ठिकाणी ट्रॅप कॅमेरे ही बसविण्यात आले. हिंगणी वनपरिक्षेत्रातील कर्मचारी व पीपल फॉर एनिमल्सच्या वन्यजीव केंद्रातील चमू यांच्या संयुक्त विद्यमाने सदर मोहीम राबविण्यात आली व दोन्ही बछड्यांना एका मोठ्या कॅरेटच्या मदतीने योग्य ठिकाणी ठेवण्यात आले व लाईव्ह कॅमेरा ट्रॅप च्या माध्यमातून रात्र भर पारख ठेवण्यात आली असता मध्यरात्रीच्या सुमारास सदर बछड्याचे आपल्या आई सोबत पुनर्मिलन यशस्वीरित्या पार पडले.
मोहिमेच्या यशस्वतेकरिता वनसंरक्षक श्रीलक्ष्मी, उपवनसंरक्षक हरवीर सिंग, सहायक वनसंरक्षक अमरजीत पवार यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय आगाशे, वनरक्षक अस्लम मौजाण, वनरक्षक शारीक सिद्दीकी, वनरक्षक ढाले, संजय पारसे, प्रशांत मसराम, अभिलाष पाटील, सुरज जोगे पीपल फॉर अनिमल्स वन्यजीव बचाव केंद्राचे सचिव आशिष गोस्वामी, वन्यजीव विभाग प्रमुख कौस्तुभ गावंडे,अभिषेक खेडुलकर, ऋषिकेश गोडसे यांनी प्रयत्न केले.
बिबट्याची मादी आणि बछड्यांची ताटातूट झाली तर मादी आक्रमक होते. अशा वेळी ती हल्ले करण्याचा धोका असतो. पण शास्त्रोक्त पद्धतीने जर त्यांचे आई सोबत पुनर्मिलंन केले. तर हा धोका निश्चितच कमी होतो. सध्या भारतात सर्वत्र सुरू असलेल्या वन्यजीव सप्ताहात आई पासून दुरावलेल्या या दोन बछड्याचे पुनर्मिलन घडवून आणणे, ही वन्यजीव प्रेमीकरिता आनंदाची बाब आहे, असे पीपल फॉर ॲनिमलचे वन्यजीव विभाग प्रमुख कौस्तुभ गावंडे म्हणाले.